Sunday, February 23, 2014

छंदपिसाट

पाचवी सहावीला असताना भुगोलाच्या पुस्तकातील शेवटचा पाठ खगोलशास्त्राचा असे. त्यामध्ये आकाशातील ग्रह तारे यातला फरक कसा ओळखावा, गुरू, शनी यांच्या रंगामध्ये कशा वेग वेगळ्या रंगांची झाक असते, ध्रुव तारा, सप्तर्षी कसा ओळखावा, अशी बरीच माहीती होती. मुंबईच्या सदानकदा फटफटल्या सारख्या दिसणार्या आकाशात मी हे सगळे पाहण्याच्या प्रयत्न करत असे. पण काहीच ओळखता येत नसे. कधी कधी कुठल्याही तार्याला हा गुरू, तो शनी असा गैरसमज करुन घेत असे. एका रात्री तर उंच विजेच्या तारांवर अडकेल्या पंतंगाच्या तुकड्यावर प्रकाश पडला होता त्यालाच गुरू ग्रह समजलो होतो!
एकदा वडिलांनी मला सप्तर्षीची ओळख करून दिली. काय आनंद झाला होता त्यादिवशी !
वडिल सुद्धा तसे छंदिष्टच होते. एकदा त्यांनी दोन बहिर्वक्र भिंगे आणुन त्यांना कार्डपेपराच्या नळीत शिताफीने बसवले. दोन भिंगांतील अंतर कमीजास्त करता येईल अशी व्यवस्था केली आणि तयार झालेल्या दुर्बीण आम्हा भावंडाना दाखवली. त्यातून वस्तू जवळ दिसण्याऐवजी दूर दिसत होती. शिवाय सगळेच उलटे दिसत होते. खाली डोकं वर पाय. भावंडांनी बघीतलं, हसले आणि विसरून गेले. सर्वसामान्य माणसं! बिचारी! पण मी पिसाटलो. एक नवीनच वेड लागलं. दुर्बीणीचं! कशी बरं असते दुर्बीण? त्यातुन दुरचं जवळ कसं बरं दिसत असेल? काय जादु असेल आत मध्ये? त्यातुन आकाशात बघितल्यावर कसं दिसत असेल? चंद्रावरचे खड्डे दिसतील का? शनीची कडी दिसतील का? गुरूचे चंद्र दिसतील का? आणि तो युरेनस, नेपच्यून, प्लुटो ते पण दिसत असतील का? दुरच्या आकाशगंगा दिसतील का?..... असंख्य प्रश्न.
माझ्याकडे अशी एखादी दुर्बीण असेल तर काय मजा येईल! पण कुठून आणावी? पण खूप महाग असेल.
गिरणीत जाणार्या वडिलांकडे कुठून येणार इतके पैसे? पण दुर्बीण तर पाहिजे. त्याशिवाय आकाशातला तो खजिना बघणार कसा? काय करावं? काही सुचत नव्हतं.

एक आयडिया! वडिलांसारखी स्वतःच दुर्बीण बनवली तर?
पण त्यातून तर सगळं दूरच दिसत होतं.
ते आपण दुरुस्त करू.
शिवाय त्यातून सगळं उलटं दिसत होतं.
आपण त्याला सुलटं करू, नाही तर आपणंच उलटे होऊन बघू.
पण त्यासाठी सामान कुठून आणायचं?
कुणाचं तरी मागून आणू.
पण काही तरी सामान आणावंच लागेल ना?
जे जे विकत आणावं लागेल ते सगळं घरी बनवू!!
छ्या हे कसं काय होइंल?
होईल आपूनच.
पण सुरवात कशी करायची?
पुस्तकं वाचून माहीती काढायची.
पहीलं स्टेशन मोठ्या भावंडांची अभ्यासाची पुस्तकं!
दहावीच्या विद्यानाच्या पुस्तकात दुरदर्शकाची माहीती होती. वाचून काढली. त्यातलं ज्ञान बकाबका गिळलं.
पहिली अडचण बहिर्वक्र भिंगं कुठून आणायची?
मोठी माणसं हुशार असतात. त्यांना सगळं माहीत असतं. त्यांना विचारावं.
वडिल दिवसभर गिरणीत असत. ते काही वाट्याला मिळायचे नाहीत.
शेजारच्या ककांना विचारलं.
"भिंगं कुठे मिळतात हो काका?"
"काय?"
"भिंग"
"म्हंजी?"
"ते असतं नाही का? ते गोल गोल, काचेचं "
"ते कशाला पाहिजे तुला?"
"दुरदर्शक बनवायला"
"काय बनवायला?"
"दुरदर्शक"
"दुरदर्शन? म्हणजे टि. व्ही? तुझ्या बानं कधी बनिवला व्हता काय टि. व्ही.?"
"दुरदर्शन नाही दु-र-द-र्श-क"
"त्याचं काय करायचं?"
"त्यातून बघायचं"
"काय? टि. व्ही.?"
"नाही आकाशात बघायचं"
"आकाशात टि. व्ही. बघायचा?"
च्यायला गेलं खड्ड्यात ते भिंग.
"ते जाऊ दे, काका तुम्ही किती शिकलात हो?"
"दुसरी नापास"
हाण तिच्या आयला!

दुसरा कोण तरी बघू. शेजारच्या दुसर्या एका काकाला पकडंल.
"काका"
"काय रे बाळ?"
"तुम्ही किती शिकलात हो?"
"दहावी पास"
हां. हा चांगला काका आहे. दहावीच्या पुस्तकात सगळं येऊन गेलंय.
"काका भिंगं कुठे मिळतात हो?"
"काय?"
हा काका बहूदा इ़ंग्लिश मेडियम मध्ये शिकलेला आहे. त्याला इंग्लिश मध्येच विचारावं.
"म्हणजे लेन्स लेन्स"
"चप्पल वाल्याकडे"
चप्पलवाल्याकढे दुर्बीणीचं भिंग? कमाल आहे? हे एवढं सोप्पं आहे? तरी खात्री करून घेतलेली बरी.
"चप्पलवाल्याकडे कसं काय मिळेल काका?"
"बुटाची लेस चप्पलवाल्याकडे मिळणार नाही तर कुठे मिळणार पिठाच्या गिरणीत?"
"लेस नाही काका लेन्स लेन्स"
"आँ? ते काय असतं?"
"त्याचा दुरदर्शक बनवतात. म्हणजे टि. व्ही. नाही. दु-र-द-र्श-क. त्यातुन आकाशात बघायचं आणि त्यातून आकाशात टि. व्ही दिसत नाही, नुसतं आकाशच दिसतं". मी शक्य तेवढं स्पष्टीकरण आधीच दिलं. उगाच नंतर गोंधळ नको.
पण काका एवढ्यानेच गोंधळले.
"ते काय मला माहीत नाही. दुसर्या कोणालातरी विचार"
"काका तुम्ही नक्की दहावी शिकलात ना?"
"मुस्काट फोडीन, चल पळ इथनं"

मग मोठ्या माणसांचा नाद सोडून दिला. काय करावं सुचत नव्हतं.
चश्म्यात सुद्धा भिंगच वापरतात हे कळल्यावर वडिलांचे, आजीचे जुनेपुराणे चश्मे तोडून फोडुन त्याच्या काचा वेगळ्या केल्या!
काचा नुसत्याच हातात धरून, मागे पुढे करून प्रयोग सुरू झाले. आणि एकदाचं तंत्र कळलं. पदार्थिक भिंगाच्या (objective lense) आणि नेत्रिकेच्या (eyepice) नाभिय अंतराचा आणि दुर्बीणीच्या वर्धन क्षमतेमधील संबध कळला.
दुर्बीणीच्या मूळ तत्व हे असं.



याप्रकारच्या दुर्बीणीला अपवर्ती प्रकारची (refracting telescope) दुर्बीण असं म्हणतात. दुर्बीणी मध्ये दोन बहिर्वक्र भिंगांचा वापर केला जातो. पहिले भिंग हे तुलनेने मोठ्या आकाराचे व मोठ्या नभिय अंतराचे असते. याला पदार्थिक भिंग (objective lense) म्हणतात. हे भिंग दुरच्या वस्तुकडून येणारे प्रकाश किरण पलिकडील बाजूस एकत्र करते. याठिकाणी त्या वस्तुची एक आभासी (virtual image) प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा मग दुसर्या लहान आकाराच्या बहिर्वक्र भिंगातून पाहीली जाते. या भिंगाला नेत्रिका (eyepice) म्हणतात. पर्दाथिक भिंगाचे नाभिय अंतर (focal length) जेवढे जास्त तेवढे त्यापासुन निर्माण होणारी आभासी प्रतिमा तुलनेने मोठी असते. त्यामुळे दुर्बीणीतून वस्तुही फार जवळ आल्यासारख्या दिसतात. म्हणजेच दुर्बीणीची वर्धन क्षमता (magnifying power) जास्त होते.
पण यापेक्षा जास्त प्रगती होईना. मग पुन्हा शोध सुरू केला.
पुन्हा एकदा खात्रीचा आधार म्हणजे पुस्तकं.
एकदा आमच्या शिरोडकर शाळेतील ग्रंथालयात जाऊन विचारले. तर तो शिपाई खेकसला. आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तक देत नाही म्हणाला. मग काय चाटायचंय ते ग्रंथालय! आमच्या सरांनीच मागितलंय पुस्तक अशी थाप ठोकून काम होतं का पाहिलं. तर म्हणाला त्या मास्तरांची चिठ्ठी घेऊन ये. कुठल्या तरी मास्तराची चिठ्ठी घेऊन खगोलशास्त्रावरची तीन पुस्तके मिळाली. जमेल तेवढी माहीती पदरात पाडून घेतल्यानंतर मोर्चा वळवला तो दादरच्या मुंबई मराठी ग्रंथालयाकडे. इकडे विज्ञान या विषयावरील पुस्तकं फक्त रद्दीत पडल्याप्रमाणे होती. एकाही पुस्तकाची फाईलमधे नोंद नाही. ज्यांची नोंद आहे ती पुस्तकं नाहीतच किंवा त्यांची जागा बदलेली. त्यामुळे काऊंटरवरच्या बायकांना विज्ञान शाखेची पुस्तकं आणा म्हणायचं आणि त्यांनी चार पाच पुस्तकं आणुन द्यायची. त्यातलं पसंत पडलेलं पुस्तक घेऊन जायचं. हे असं चाललं होतं. पण एवढ्या सगळ्यातून एक फायदा झाला. "दुर्बीणींचं विश्व" नावाचं एक पुस्तक हाती पडलं.
पुस्तक वाचलं, झपाटल्यासारखं वाचलं, पुन्हा पुन्हा वाचलं. त्यात युरेनस ग्रहाचा शोध लावणार्या विल्यम हर्षल बद्दल माहिती होती. त्याने दुर्बीण कशी बनवली? त्यासाठी लागणार्या सामानाची व्यवस्था कशी केली? याची पुष्कळ माहीती मिळाली. पण हा लेख सगळा विज्ञानेतिहास होता. दुर्बीण कशी बनवावी याची तांत्रिक माहीती मात्र कुठेच मिळाली नाही. पण दुर्बीण बनवण्याची एक भयंकर ओढ निर्माण झालं. अरे तो हर्षलांचा विल्यम जर बनवू शकतो तर मी का नाही?
पण मार्ग काही सापडत नव्हता.
एक वर्ष गेलं, दोन गेली, तीन गेली. दहावीला पोहोचलो. आणि धागा हाती लागला. नेहरू विज्ञान केंद्रात मे महिन्याच्या सुट्टीत मुलांनसाठी दुर्बीणी बनविन्याचे छंद वर्ग चाललात अशी माहीती मिळाली. कोण आनंद झाला!
आईवडिलांकडे तगादा लावला, जाणार, जाणार, जाणार, जाणार...,
घरच्यांची फिलॉसॉफी वेगळी होती. पुर्ण व्यवहारी. हे पालथे धंदे करून काय फायदा, त्यापेक्षा ज्याने पोट भरेल असं काही तरी कर, असे सल्ले मिळायला लागले. नाही तर गावाला तरी चल. काय गावाला मजा करायची ती कर. पण ह्या असल्या उद्योगाबद्द्ल बोलायचं नाही. घोर निराशा झाल्यासारखं वाटलं. गावी मन लागेना. जस जसा छंदवर्ग सुरू होण्याची तारीख जवळ यायला लागली तशी माझी तगमग वाढू लागली आणी एकदिवस बंडखोर वृत्ती उफाळून आली.
ठरवून टाकलं. काय व्हायचं ते होऊ दे! पण छंदवर्गाला जायचंच. आई कडून हट्ट करून पैसे घेतले आणि कोल्हापूरहून एकटाच मुंबईला आलो! एवढ्या मोठा प्रवास एकट्याने पहिल्यांदाच करत होतो, लाल डब्याच्या यश्टीत बसायला जागा नव्हती. १२ तासाचा प्रवास उभा राहूनच केला! मुंबईला पोहोचलो तेव्हा पाय सुजले होते. आत्तेभावाकडे खानावळ लावली आणि नेहरू विज्ञान केंद्रात दिडशे रुपये भरून छंदवर्गात गेलो.
तिथे माझ्यासारखी काही छंदपिसाट मुले होती, तर काही उगाचच आली होती.
वर्ग एकूण १५ दिवसांचा होता. म्हणून नेहरू विज्ञान केंद्राचा पंधरा दिवसाचा पास पण मिळाला होता. मग काय ते अख्खं नेहरू विज्ञान केंद्र माझ्याच बापाची मालमत्ता असल्यासारखा मी वर्ग सुरू होण्याआधी एकदिड तास आधीच पोहोचत असे. त्या विविध वैज्ञानिक वस्तूंमधून उगचंच भटकायचं. काय दिवस होते ते!
दुर्बीण बनवण्याबरोबरच इतर बरेच वर्ग होते. कॉंप्युटर वर्गात विशेष गर्दी होती. कारण त्याच्या सर्टीफिकेटचा कदाचित उपयोग होईल असं एक विद्यार्थी म्हणाला होता. मी दुर्बीण बनवण्याचा वर्गात आहे म्हटल्याबरोबर त्याचा काय फायदा म्हणून त्याने मलाच विचारले आणि माझी निवड चुकली म्हणून मला हसला देखील. मी काय बोलणार? माझी चूक मान्य केली झालं!
इतर प्रत्येक छंदवर्गांसाठी ३०, ४० विद्यार्थी होते. दुर्बीणी बनवण्यासाठी होते फक्त सहा विद्यार्थी!
पहिल्या दिवशी थोडी निराशा झाली. पहिल्या दिवशी प्रस्तावनेसाठी सर्व वर्गातील मुलांना एकाच मोठ्या हॉल मध्ये बसवून शिक्षकांची, केंद्राच्या कामाची ओळख करून देण्यात आली, पण ती इंग्लिशमधे! इथं कुणाच्या बापाला समजतंय इंग्लीश? मला धड शुद्ध मराठी देखील समजत नव्हतं! तिकडे भाषण सुरू होतं नि मी नुसतं इतर मुलांच्या तोंडाकड बघत राहीलो.

पण प्रत्यक्षात मला वाटलं होतं त्यापेक्षा छंदवर्ग खूपच माहीती पुर्ण होता. मला वाटलं होतं दुर्बीणी बनवण्याचा वर्ग म्हणजे तयार भिंगं आणून एखाद्या नळीला जोडायची आणि झाली दुर्बीण तयार. पण इथे तर दुर्बीणीत लागणारे आरसे कसे बनवयाचे याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. आता इथं नक्की काय चालतं ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा दुर्बीणीच्या तांत्रिक माहीतीकडे वळू.

वर सांगितल्याप्रमाणे दुर्बीणीमध्ये दुरच्या वस्तू कडून येणारे प्रकाश किरण बहिर्वक्र भिंगाच्या (convex lense) सहाय्याने एकत्रित करायचे. याठिकाणी त्यावस्तूची एक आभासी प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा मग एका लहान भिंगातुन (eyepiece) पाहिली जाते. हि आभासी प्रतिमा जितकी स्पष्ट तितकीच दुर्बीण अधिक कार्यक्षम. पदार्थिक भिंगाचा व्यास जेवढा मोठा तेवढे तिचे क्षेत्रफळ अधिक, जेवढे क्षेत्रफळ अधिक तेवढे तिची प्रकाश गोळा करण्याची क्षमता अधिक, म्हणजेच तिच्यापासून तयार होणारी आभासी प्रतिमा तेवढी अधिक प्रखर आणि स्पष्ट. थोडक्यात अशा प्रकारच्या दुर्बीणीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पदार्थिक भिंगाचा व्यास वाढवावा लागतो. पण इथूनच अडचणींना सुरवात होते. मुळात प्रकाश भिंगातून आरपार जात असल्यामुळे भिंगासाठी वापरण्या येणारी काच अगदी नितळ असावी लागते. तिचा अपवर्तनांक (refractive index) अधिक असावा लागतो (काचेचा अपवर्तनांक म्हणजे काचेची प्रकाशाची दिशा बदलण्याच्या क्षमतेची मोजणी). अशी काच बरीच महाग असते. शिवाय काचेची प्रकाशाची दिशा बदलण्याची क्षमता हि प्रकाशाच्या रंगाप्रमाणे बदलत जाते. पांढरा प्रकाश हा मुळातच वेगवेगळ्या रंगाचा बनलेला असल्याकारणाने काचेचे भिंग त्यातून जाणार्या प्रकाशाचे त्यांच्या रंगानुसार किंचीत कमी अधीक प्रमाणात दिशापरिवर्तन करते आणि तयार झालेली आभासी प्रतिमा ही काहीशी वेगवेगळ्या रंगाची झालर असल्याप्रमाणे दिसते. याला तांत्रिक भाषेत अपस्करण (chromatic abaration) म्हणतात. काचेच्या प्रिझममधून प्रकाश जाताना निरनिराळे सप्तरंग दिसतात तसंच आहे हे.
आता यावरचा उपाय न्युटनकाकानेच सांगून ठेवलाय. बहिर्वक्र भिंगाप्रमाणे अंतर्वक्र आरसासुद्धा (concave mirror) आभासी प्रतिमा तयार करू शकतो.
कोणताही आरसा सगळ्या रंगाचे परावर्तन एकाच दिशेने करतो त्यामुळे बहिर्वक्र भिंग वापरल्यामुळे येणारी रंगाची अडचण आरसा वापरल्याने येत नाही.
या प्रकारच्या दुर्बीणीला परावर्ती दुर्बीण (reflecting telescope) असं म्हणतात. या प्रकारच्या दुर्बीणीचं तत्व हे असं.



या दुर्बीणी मध्ये दुरच्य वस्तूकडून येणारे प्रकाश किरण एका अंतर्वक्र आरशावरून परावर्तित होतात व आरश्या समोरच वस्तूची एक आभासी प्रतिमा तयार होते. आता ही प्रतिमा आरश्या समोरच तयार होत असल्यामुळे ती पाहताना बघणार्याचंच डोकं आरशासमोर येईल आणि त्यामुळे दुरच्या वस्तूकडून येणारे प्रकाश किरण अडवले जातील. यासाठी आरश्या समोरच अजून एक लहान सपाट आरसा ४५ अंशाचा कोनात लावला जातो. यामुळे तयार होणारी आभासी प्रतिमा आरश्यासमोर तयार होण्याऐवजी आरश्याच्या एका बाजूला तयार होते. आता प्रतिमा निरिक्षक एक लहान भिंगाद्वारे पाहू शकतो. बहिर्वक्र भिंगाप्रमाणेच आरशाचा आकार जेवढा जास्त तेवढी त्याच्यापासून निर्माण होणारी आभासी प्रतिमा अधिक स्पष्ट असते.

बरं आता पुन्हा छंदवर्गा कडे वळू.

छंदवर्गा मध्ये आम्हाला शिकवणार होते दुर्बीणी मध्ये वापरला जाणारा आरसा कसा बनवायचा ते!!!
च्यायला दिल एकदम खुश झाला! आंधळा मागतो येक डोळा नि देव देतो दोन डोळे!!

आता हे आरसा बनवायचं काय प्रकरण आहे हे पाहू.
हा अंतर्वक्र आरसा म्हणजे एक तुळतुळीत, प्रकाशाचं सहज परावर्तन करू शकेल असा अंतर्वक्र पॄष्टभाग. मुळात रिफ्लेक्टिव पॄष्ठभाग देऊ शकेल असा एक पदार्थ म्हणजे कोणताही चकचकीत पॄष्ठभाग असणारा धातू. ऊदा. चांदी, अॅषल्यूमिनिअम. अशा पदार्थाची पुरेशी जाड अशी एक गोलाकार चकती (डिश) घ्यायची. तिला दोन सपाट पृष्ठभाग असतात. यातील एक सपाट पृष्ठभाग घासून त्याला आतल्या बाजूस गोलाई द्यायची. हा गोलाकार भाग घासून घासून अगदी आरशाप्रमाणे चकचकीत करायचा कि झाला दुर्बीणीत वापरला जाणारा अंतर्वक्र आरसा!
गॅलेलिओने जी दुर्बीण बनवली त्यामधे आरश्या ऐवजी भिंगे वापरण्यात आली. भिंगामधे असणारा रंगाचा दोष लक्षात आल्यानंतर अंतर्वक्र आरसा वापरण्याची युक्ती न्युटनने सुचवली. पण त्याकाळी सगळे आरसे हे धातूचेच असत. त्यासाठी तांबे आणि जस्ताचा मिश्रधातू वापरण्यात येत असे. त्याला स्पेक्युलम म्हणत असत. विल्यम हर्षलने अशाच प्रकारचा आरसा त्याच्या दुर्बीणीत वापरला होता. नंतरच्या काळात काचेवर धातूचा मुलामा देण्याच्या विविध पद्धती विकसित झाल्या आणि स्पेक्युलम कालबाह्य झाले. धातू वापरण्याचा मुख्य फायदा हा कि धातू हा मूळातच प्रकशाचे परावर्तन करीत असल्यामुळे त्याच्या अंतर्वक्र पृष्ठभागावर वेगळा मुलामा द्यायची गरज नसते. काचेच्या पॄष्ठभागावर मात्र अॅयल्युमिनिअम किंवा चांदीचा मुलामा द्यावा लागतो.
तर अंतर्वक्र आरसा बनविण्यासाठी आवश्यकता असते ती काचेच्या दोन जाड गोल तबकडींची. एक काच टेबलावर घट्ट अशी बसवायची. तीवर काचेपेक्षा कठीण अशा एकाद्या पदार्थाची पावडर पसरवायची. थोडं पाणी शिंपडायचं आणि दुसरी तबकडी त्यावर ठेवायची. तबकडीवर जरा जोर द्यायचा किंवा एखादं वजन ठेवायचं आणि खालच्या तबकडीवरून सरकवत पुढे न्यायची. काही इंच पुढे नेल्यानंतर पुन्हा सरकवत मागे आणायची. वरच्या तबकडीचं हे सरकवणं पंधरा-वीस वेळा चालू ठेवायचं. त्यानंतर खालची तबकडी काही अंशानी घड्याळ्याच्या दिशेनी फिरवायची त्याच बरोबर वरची तबकडीसुद्धा काही अंशाने पण घड्याळ्याच्य विरुद्ध दिशेने फिरवायची. आणी पुन्हा पंधरा-वीस वेळा घासावी.
अशा प्रकारे पंधरा ते वीस वेळा घर्षण, खालच्या आणि वरच्या तबकडीचं काहीं अंशांनी पण विरुद्ध दिशेला फिरवणं हि सायकल सुरू ठेवावी. अशा बर्याच सायकल नंतर वरच्या तबकडीचा पृष्ठभाग अंतर्वक्र तर खालच्या तबकडीचा पॄष्ठभाग बहिर्वक्र असा घासला जातो. वरची तबकडी आपण अंतर्वक्र आरसा म्हणून वापरतो तर खालच्या तबकडीला टूल (tool) म्हणतात.
आता तुम्ही म्हणाल आपण तर सरळ रेषेत मागे पुढे घासत असताना पॄष्ठभागांना कशी काय वक्रता येते? याचं उत्तर मात्र मी वाचकांवर सोडतो. थोडी डोक्याला खुराक.
घर्षणासाठी सुरवातीला जाड खडे असणारी पावडर वापरावी अगदी रेतीप्रमाणे. त्यामुळे घर्षणाची क्रिया जलद होते. सुरवातीला आवश्यक अशी वक्रता आणण्यासाठी ही पावडर आवश्यक असते.
आता आवश्यक अशी खोली आरशाला आली की नाही हे कसे ओळखावे? तर घासलेल्या पॄष्ठभाग थोडा ओला करावा. त्यामूळे खडबडीत असलेला आरशाचा पॄष्ठभाग काही प्रमाणात प्रकाश परावर्तीत करू शकेल. अशा ओल्या आरश्यावर सुर्याची किरणे पडू द्यावीत. लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे अंतर्वक्र आरसा ही किरणे त्याच्या फोकल बिंदूवर एकत्रित करतो. लहानपणी आपण काचेचे भिंग उन्हात धरून कागद जाळत असू तोच हा प्रकार. भिंगा ऐवजी आपण आरसा वापरतो इतकाच. आरसा आणी हा फोकल बिंदू यांच्या अंतर आपल्याला पाहिजे तितके असेल तर आरश्याला योग्य वक्रता आली आहे असं समजावं. साधारण पणे आरश्याच्या व्यासाच्या आठ किंवा त्यापेक्षा जास्त पटीच्या अंतरावर फोकल बिंदू असला तर त्यापासून बनणारी दुर्बीण बनवायला सोपी असते. या अंतराला आरशाचे नाभिय अंतर (focal length) म्हणतात. नाभिय अंतर जेवढे कमी तेवढी आरशाची खोली जास्त आणी त्यामूळे जास्त भाग घासून काढावा लागणार. पण हे आरसा घासायचं काम वाटतं तेवढं सोप नाही बरं का? काच ही एक ठिसूळ असली तरी ती निसर्गातील कठीण पदार्थापैकी एक आहे. म्हणूनच तर काच कापण्यासाठी हिरकणी चा वापर केला जातो.

कोणतीही वस्तू घासली जाउ शकते ती फक्त त्यावस्तू पेक्षा कठीण असणार्या वस्तूनेच. काच ही स्वत:च फार कठीण असते हे पचायला काही जणांना कठीण जाईल. हे समजून घेण्यासाठी काही सोपे प्रयोग करू शकतो. एखाद्या लोखंडी खिळ्याने एख्याद्या काचेवर ओरखडा पडतो का पहा. पोलाद वापरून पहा, काळ्य़ा पत्थरच्या तुकडा वापरून पहा. किंवा रोजच्या वापरातल्या आपल्या दॄष्टीने कठीण असलेला कोणताही कठीण पदार्थ वापरून पहा. काचेला मुळीच ओरखडा पडत नाही पण काचेवर एखादा आघात झाला तर तयार होणारे भेगा मात्र कचेमधून सहज पसरल्या जातात. त्यामूळे काच सहज तडकते. मग आपण म्हणतो काच ठिसूळ असते!
काचच काय पण पोलाद, लोखंडासारखे धातू किंवा दगड घासण्यासाठी काही ठराविक पदार्थ वापरावे लागतात. काही पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत तर काही प्रयोग शाळेत बनवावे लागतात. खाणीत सापडणारे काही प्रकारचे खडक हे अशा कामी वापरता येऊ शकतात. प्रयोग शाळेत सिलिकॉन कार्बाईड, ऍल्युमिनिअम ऑक्साईड अशा प्रकारचे पदार्थ वापरले जातात. या पैकी सिलिकॉन कार्बाईड तुलनेने अतिशय कठीण त्यामुळे हिऱ्याखालोखाल हा पदार्थ वापरला जातो. त्यामानाने ऍल्यूमिनिअम ऑक्साईड कमी कठीण असल्याने हळूवार घर्षणासाठी वापरला जातो. आपण बऱ्याच जणांनी हे पदार्थ पाहिलेले असतील. उदा. धारवाले सुरीला धार काढण्यासाठी वापरतात ती गोल चकती, सुतार लोक त्यांच्या पटाशीला धार काढण्यासाठी वापरतात तो दगड हे सारे सिलिकॉन कार्बाईड पासून बनवलेले असते. इतकच काय लोखंडाचा गंज काढ्यण्यासाठी आपण जो पॉलिश पेपर (किंवा सँड पेपर) वापरतो यावर सिलिकॉन कार्बाईडची पावडरच चिकटवलेली असते.

बरं पण काच तरी काही कमी चिवट नसते. सिलिकॉन कर्बाईडने काच घासताना काचेबरोबरच सिलिकॉन कार्बाईडचा सुद्धा पार बुक्का पडतो.
वर सांगितल्या प्रमाणे काचेवर प्रक्रिया केली जाते ती तिन टप्प्यात. पहिला टप्पा काचेचा सपाट पॄष्ठभाग घासून अंतर्वक्र करणे, दुसरा ट्प्पा अंतर्वक्र पॄष्ठभाग अगदी गुळगुळीत करणे आणी शेवटचा टप्पा तिची तपासणी करून पॉलिश करणे. पहिल्या टप्प्यातील काच घासण्याचं काम जलद होण्यासाठी सर्वसाधारण पणे सिलिकॉन कर्बाईड्ची पूड वापरली जाते. ही पूड जाड असते, अगदी रेतीप्रमाणे. दुसर्या टप्प्यातील कामासाठी तुलनेने कमी कठीण अशी अॅरल्युमिनिअम ऑक्साईड किंवा खाणीतील विशिष्ट दगडाची पूड वापरली जाते. या प्रकियेला स्मुथिंग म्हणतात. स्मुथिंगसाठी पाच सात वेगवेगळ्या प्रकारची पूड वापरली जाते. सुरवातीला जाड कण असणारी, नंतर थोडे बारीक कण असणारी, त्यानंतर त्याहून बारीक कण असणारी आणि सगळ्यात शेवटी अगदी धूळ असल्यासारखी पावडर वापरतात. कणांच्या आकाराप्रमाणे काचेचा पॄष्ठभागही गुळगुळीत होत जातो.

छंदवर्गामध्ये लागणारी पावडर नेहरू विद्यान केंद्रानेच दिली होती. आम्ही मुलांनी या केंद्रात चार इंच व्यासाचा अंतर्वक्र आरसा बनविला होता. पण आरशाला पॉलिश मात्र केलं नव्हतं. हे पॉलिश काय प्रकरण आहे हे नंतर पाहू. दहा दिवस काच घासण्याचं काम सुरू होतं. त्यांनंतर पॉलिश केलं गेलं. आणि त्यानंतर छंदवर्ग संपला! फक्त अर्धवट असा अंतर्वक्र काच बनवून संपला. पुर्ण दुर्बीण तयार झालीच नाही, तर त्यातुन निरिक्षण करणं तर सोडाच. इकबाल नावाचे सर हे सारं शिकवित होते. त्यांना त्या पावडरी, काचेच्या तबकड्या कुठे मिळतील म्हणून चौकशी केली. सरांनी गिरगावच्या राजू पटेलांचा फोन नंबर दिला. राजू पटेल हे मुंबईतील एक दुर्बिणींची उत्पादक आणि विक्रेते. तसेच ते एक हौशी खगोल अभ्यासक ही आहेत. नेहरू विज्ञान केंद्राच्या गच्चीवरील सौर दुर्बीणीचा आराखडा यांनीच बनविला. यांना फोन करून आवश्यक वस्तुंच्या किमती विचारल्या तर ऐकून दरदरून घाम फुटला. सगळच साहित्य एवढं महाग होतं कि हा छंदच परवडणेबल नव्हता. पण आशा सोडली नाही.

शेवटी आम्ही फुकटे छंदिष्ट! छंद जोपासावा पण कमीत कमी पैसे खर्च करून! एक तत्व माहीत होतं जर एखाद्या पदार्थाने काचेला ओरखडा पडत असेल तर तो पदार्थ काच घासायला वापरता येऊ शकतो. असे कोणते पदार्थ आपल्या रोजच्या वापरात असू शकतील या दिशेने विचार सुरू केला. महाराष्ट्रात सापडणार्या काळ्या दगडामध्ये लोह विपूल प्रमाणात असतं हे शाळेत शिकलो होतोच. हाच दगड वापरला तर? कुठून तरी काळ्या दगडाचा एक तुकडा आणला आणि तो काचेच्या तुकड्यावर घासून पाहिला. पण चिवट काचेने दाद दिली नाही!

अशा बऱ्याच शोधानंतर शेवटी एकदाचा तो पदार्थ सापडला. एका सकाळी आमच्या विभागातील पिठाच्या गिरणीत एकजण गिरणीतील दगडी जातं बाहेर काढून त्यावर दाते पाडण्यासाठी ते ठोकत बसला होता. शेवटी घर्षणासाठीच वापरण्यात येणारा तो दगड. काय भरवसा तो काचेपेक्षा कठीण असेलही कदाचित. घरी तशाच दगडाचा एक तुकडा होता. घरी सुरीला धार काढण्यासाठी वडिल तो वापरत असत. एका काचेच्या तुकड्यावर तो दगड घासून पाहिला तर तो काचेवर एक सुरेख स्पष्ट दिसणारा ओरखडा पडलेला दिसला! चला एक काम झालं. आपल्याला आवश्यकता आहे ते याच दगडाच्या पावडरची. घरी एक खलबत्ता पडून होता. घरात मिक्सर आल्यापासून बिचारा रिटायर्ड झाला होता. मी त्याला परत कामाला लावले आणि घरातला धार काढायचा दगड कुटायला सुरवात केली. अपेक्षेप्रमाणे घरून शिव्या मिळाल्याच. पण एकदा दगडाचे तुकडे झाल्यावर परत थोडाच जोडता येणार आहे. त्यामुळे सगळेच मुकाट्याने शांत झाले. दगड कुटायचं काम सुरू झालं. ठोक् ठोक् चा आवाज काही दिवस सुरू राहिला. शेजारी पाजारी कावून घरी विचारायला आले. ते दुर्बीणीच सांगितल्यावर गोंधळले. कुठं दुर्बीण, कुठं दगड नि कुठं तो खलबत्ता! कशाचा कशाला संबध? हा त्रास काही दिवस तरी आपल्याला सोडणार नाही अशी खात्री पटाल्यावर मुकाट्यानं माघारी फिरले.
दगड तर कुटला, आता वेगवेगळ्या जाडीची पावडर कशी वेगळी करायची? पिठाच्या वेगवेगळ्या चाळण्या वापरून पहिल्या काही जाड कण असणारी पावडरी तर मिळाल्या. सुकी पावडर वस्त्रगाळ करूनही काही पावडर मिळाल्या पण सगळ्यात शेवटची धूळीप्रमाणे असणारी पावडर मात्र काही मिळत नव्हती. कारण कुटताना अशी धूळ हवेतच उडून जात होती! शेवटी अगदी बारीक जाडसर कापडातून वस्त्रगाळ करून पावडर मिळाली एकदाची. काही चमचे पावडर मिळवण्यासाठी काही तास वस्त्रगाळ करावं लागत होतं. पण इथं कुणा लेकाला काही उद्योग होते? अकरावीचं कॉलेज संपलं की आपण मोकळेच होतो. (त्यावेळी मी अकरावी आर्टस् ला होतो. माझे प्रगती पुस्तकावरचे माझे मार्कस् पाहून हा अकरावी आर्टस् च्या लायकीचा माणूस आहे म्हणून घरी घोषीत झाल्यामुळे मी एका टुकार कॉलेजात अकरावी शिकत होतो. त्यावर्षी मी सहा पैकी पाच विषयात नापास झालो. ज्या विषयात पास झालो त्याचा पेपर मला आधी च मिळाला होता आणि त्यातही मि फक्त एका मार्काने पास झालो होतो )
जे काय छंद वर्गात शिकलो होतो त्याचा पुन्हा एकदा सराव करायची वेळ आली होती. ५ मिमि जाडीचे एक काचेचे दोन तुकडे कुठून तरी पैदा केले. पक्कड घेऊन काचेचे लहान लहान तुकडे काढू लागलो आणि थोड्या वेळाने ५ सेमी व्यासाची एक सुरेख चकती तयार झाली. धार काढायच्या दगडाचा एक छोटा तुकडा मी शिल्लक ठेवला होता. त्याने चकतीच्या कडांना फिनिशिंग केलं. अशाच प्रकारे अजून एक चकती तयार केली. जमीनीवर काचेचे तुकडे पसरले. त्यामुळे पुष्कळ शिव्या खल्ल्या.
एक चकती आरसा म्हणून वापरली तर दुसरीचा टूल म्हणून वापर केला. वास्तविक ५ सेमी व्यासाचा आरसा बनविण्याची कल्पना मूर्खपणाची होती. आरसा हा कमीत कमी तीन इंच व्यासाचा असेल तर तो बनवणे फायदेशीर असते. पण मला तर फक्त काच घासण्याची पद्धत अभ्यासायची होती.
शेवटी एका मे महिन्यात ५ सेमी व्यासाची १ मिटर फोकल लेंग्थ असणारा एक आरसा तयार झाला. सहाजिकच त्यावर चांदी किंवा ऍल्यूमिनिअमचा थर नव्हता. तो बाहेरून करून घ्यावा लागतो. पण आरशावर पॉलिश मात्र केलं होत.
आता हे पॉलिशींग काय असतं आणी ते कसं करायचं हे थोडक्यात पाहू.
आरसा तयार करताना कितीही बारीक पावडर वापरली तरी काच कधीच नितळ पारदर्शक होत नाही. डोळ्यांन न दिसणार्या सुक्ष्म खड्ड्यांमुळे ती दुधी रंगाची दिसते. पॉलिश केल्यानंतर हे बारीक खड्डे सुद्ध घासून काढले जातात. वर सांगितल्याप्रमाणे काचेचं घर्षण करताना आपण टूल म्हणून दुसरी काचेची तबकडी टूल म्हणून वापरतो. घर्षण करताना हा टूल पावडरीच्या कणांना एक मजबूत असा बेस देतात. त्यामूळेच हे कण आघात करून आरश्यावर (आणि टूलवर सुद्धा) घर्षण करू शकतात. पॉलिश करताना मात्र आपण हा मजबूत बेस वापरत नाही. तर यासाठी आपण बेस म्हणून डांबर वापरतो. असा डांबराचा टूल तयार करताना, काचेच्या टूलवरच डांबर वितळवून ओतले जाते. साधारण गरम आणी मऊ असतानाच त्यावर आरशाचा पृष्ठभागाचा दाब देऊन बहिर्वक्र आकार दिला जातो. घर्षण योग्य रितीने व्हावं म्हणून त्यावर इंग्रजी व्ही आकाराचे चॅनल कापून एक चौकोनी तुकड्यांची ग्रिड बनवावी.

यावेळेस घर्षणासाठी कठीण अशा सिलिकॉन कार्बाईडची पावडर न वापरता पॉलिशिंग साठी योग्य अशी फेरिक ऑक्साईड किंवा सेरिअम ऑक्साईडची पावडर वापरावी. या पदार्थाचें कण बरेच लहान असतात शिवाय फार कठीण नसल्याने काचेवर ओरखडे देखील पडत नाहीत. अशा डांबराच्या टूलवर आरसा घासताना डांबर कणांना एक मऊ बेस देते त्यामुळे कण काचेवर अगदी हळूवार पणे घर्षण करतात व काचेला आवश्याक असा नितळ पणा येतो. ही बरीच वेळखाऊ प्रक्रिया असते.
माझ्या छोट्याश्या काचेला पॉलिश करताना मी फेरिक ऑक्साईड वापरले होते. माझा मावस भाऊ सदा पाटील काळबादेवीला कामाला होता. त्याने कुठेतरी केमिकल्सचं दुकान पाहिलं होतं. फेरिक ऑक्साईडचं का काय म्हणताते त्याचं नाव कागदावर लिहून द्यायला सांगितलं आणि घेऊन आला. वास्तविक हे प्रयोग शाळेत वापरलं जाणारं रसायन होतं त्याचा पॉलिशिंगसाठी किती उपयोग होईल शंका होती. पण त्याने काम झालं आणि माझा छोटासा आरसा नितळ झाला.
एका दुपारी आकाशात ढग असताना मी माझ्या अरशाने त्यांच्या स्वच्छ प्रतिमा एका कागदावर पाहिल्या आणि आरसा ढोबळमनाने का होईना पण काम करत असल्याची पावती मिळाली.
ऎल्युमिनिअमचा थर मात्र घरी देता येण्यासारखं नव्हतं. मोठमोठे दुर्बीण उत्पादाक सुद्धा हे काम बाहेरूनच करून घेणं पसंत करतात. पण एवढ्या छोट्याशा अरशावर रिफ्लेक्टीव कोटिंग करून घेणं शहाणपणाचं नव्हतं. पण या कामा मुळे ग्रांईडींग आणि पॉलिशिंगचे बरेच बारकावे ध्यानात आले होते.
मध्यंतरी पुन्हा एकदा बंडखोरी केली.अकरावी आर्टस् अगदी वाईट नापास होऊन सोडली! एक वर्ष वाया घालवलं. पुन्हा एका टुकार ज्युनिअर कॉलेजमध्ये गेलो. नाहीतर मला कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये मला उभं केलं असतं म्हणा! पण मी पुन्हा एकदा अकरावी पण विद्न्यान शाखेत प्रवेश घेतला. आणि आश्चर्य म्हणजे पहिल्याच परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून पास झालो! पण दुर्बीणीचा विषय मात्र मागे राहीला. पदवी आणि व्यावसाईक शिक्षण पूर्ण झाल्यावर एका फडतूस कंपनीत फडतूस पदावर कामाला राहिलो. पण हाती थोडा पैसा खेळू लागल्यावर पुन्हा एकदा माझी वळवळ वाढली. थेट सहा इंच व्यासाची दुर्बीण बनवायचं पक्कं केलं.
पण यावेळेस ढोबळ पणा करायचा नव्हता. अनमान धपक्याने कामं होतात पण त्यासाठी बरेच श्रम वाया जातात. कामा मध्ये पद्धतशीर पणा असेल तर फार कमी कष्टात काम होऊ शकतं हे पक्कं समजलं होतं. मधल्या काळात अल्बर्ट इंगल्स या संपादकाने संपादित केलेलं “एमॅच्युअर टेलेस्कोप मेकिंग” हे एक उत्कृष्ट पुस्तक आमच्या कॉलेजच्या म्हणजे डि. जी. रुपारेल कॉलेजच्या ग्रंथालयात उपलब्ध असल्याचं समजलं. तिथल्या ग्रंथपालांना कॉलेजचा माजी विद्यार्थी असल्याचं सांगुन पुस्तक मिळवलं. पुस्तकाची अगदी पारायणं केली. आरशाची अचूकता मोजण्यासाठी वापरण्यात येणारी फोकाल्ट टेस्टचाही अगदी बारीक अभ्यास केला. आणि पुन्हा एकदा दुर्बीण बनविण्याच्या कामाची सुरवात केली.
सहा इंच व्यासाच्या दोन तबकड्या बजारातून विकत आणल्या. एवढ्या मोठ्ठ्या काचेसाठी पुन्हा एकदा दगड कुटायची मात्र तयारी नव्हती! मग काचेच्या दुकानातूनच चौकशी करायला सुरवात केली. शेवटी एका दुकानातून माहीती मिळाली. मुंबईत सात रस्त्याला कारखान्यांसाठी घर्षणासाठी लागणारी पावडर मिळते असं कळलं. दुसऱ्याच दिवशी सातरस्ता गाठला आणि पावडर बद्दल विचारलं. एका नोकराने पावडरींचं प्रचंड मोठं गोडाऊन दाखवलं. वेगवेगळ्या जाडीच्या कणांच्या पावडरी तिथे पोती भरुन ठेवल्या होत्या. आणि आश्चर्य म्हणजे त्या पावडरी दुसरं तिसरं काही नसून मी फोडलेल्या दगडांच्याच होत्या! पॉलिशींग साठी लागणारं फेरिक ऑक्साईड आणि सेरिअम ऑक्साईडही उपलब्ध होतं. सेरिअम ऑक्साईड फेरिक ऑक्साइड पेक्षा फार मोठ्या वेगानं काम करतं. म्हणून तेही पन्नास ग्रॅम घेतलं.
घरी पुन्हा एकदा काच घासायचं काम सुरू झालं. घरच्यांनी विशेष करून शेजाऱ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.
काच घासणे, त्यावर ओरखडा पडला म्हणून तो पुन्हा आगोदरच्या पावडरने घासणे, डांबराचा टूल तयार करणे, तो खराब झाला म्हणून पुन्हा दुसरा तयार करणे असं करता करता दहा महिने गेले.
पॉलिशिंग साठी विशेष काळजी घेतली. मला माझ्या आरशावर एकही ओरखडा किंवा खड्डा नको होता. त्यामुळे हिरे तपासायच्या भिंगातून ओरखडे ओळखून मी पॉलिशिंगची प्रकिया करत होतो. फोकाल्ट टेस्ट करून आवश्यक असणारी अचूकता आरशात आणली आणि समाधान झाल्यावर आरसा ऍल्युमिनिअमचा थर देण्यासाठी राजू पटेलांकडे गेलो. पेपरातून चकाकणारा आरसा उलगडून राजू पटेलांसमोर ठेवताच ते उत्साहने म्हणाले,
“एकदम परफेक्ट पॉलिश किया तुने छोकरे!”
मी एकदम खुश झालो. माझा पहिलाच आरसा आणि त्याचं राजू पटेलांसरख्या दिग्गजाने कौतूक करावं, साधं काम आहे का?
शेवटी पटेलही हौशी दुर्बीण बनविणारेच. त्यांना चैन पडेना. त्यांनी आपली टेस्टींग उपकरणं काढून आरसा त्यामधे जोडला आणि अचूकता मोजण्याचा प्रयत्न केला. राजू पटेल हे यामध्ये एवढे एक्सपर्ट आहेत की ऍल्युमिनिअमचा थर न लावताच आरसा दुर्बीणीच्या नळीत जोडून त्याची अचूकता मोजतात. त्यांनी बराच वेळ प्रयत्न केला पण काही बोलत नव्हते. मी काय समजायचं ते समजलो. आरशाचा पुरता बट्ट्याबोळ झाला होता. शेवटी आरसा बाहेर काढता काढता म्हणाले. तुला ऍल्युमिनिअम कोटिंग करुन देतो. मग टेस्ट करू. मी निराश झालो. विचार केला. नाही तरी आपली पहिलीच दुर्बीण आहे. बिघडली तर बिघडली. दुर्बीण पुर्ण केल्याचं समाधान तरी मिळेल.
राजू पटेल माझ्या एकट्यासाठी ऍल्युमिनिअम कोटिंग करणार नव्हते. दर तीन-एक महिन्यांनी लॉटनेच कोटिंग करावे लागते. त्यामुळे वाट पाहाणं आलंच.
मधल्या काळात मी दुर्बीणीची नळी, स्टॅंड यावर काम केलं. दुर्बीणीच्या नळी साठी महंमद अली रोडवर बराच फिरलो. मला अंदाजे सात इंच व्यासाची पि.व्हि.सी. पाईप हवा होता. अडचण ही होती कि एवढ्या मोठ्या नळीचा पाच फूट लांबीचा तुकडा कोणी द्यायला तयार नव्हता. शेवटी एका डीलर कडे एक तुकडा होता पण त्याच्या भायखाळ्याच्या गोडाऊन मध्ये. तसाच भायखाळ्याला येऊन नळी घेऊन घरी आलो. परेलला आल्यावर सगळेच कुतुहलाने नळीत कडे पाहत विचारत होते,
“हे कशासाठी आणलंस रे?”
“कौलांसाठी पोखर बनवायला”, मी थाप मारली. परेल मधल्या त्या गिरणगावात दुर्बीण बनवणे हा प्रकार आई शप्पथ कुणाच्या गळ्यात उतरला नसता/नव्हता!
काही महिन्यानंतर राजू पटेलांचा फोन आला तुझ्या आरशावर कोटिंग झालेलं आहे घेऊन जा. मी घाबरत घाबरतचं राजू पटेलांकडे गेलो. कोटिंग नंतर पटेलांनी आरसा तपासुन ठेवला असणार. राजू पटेल हा फार फटकळ माणूस. आरसा खराब निघाला तर चार शिव्या द्यायला ही कमी करायचा नाही. घराची बेल वाजवली. दरवाजा उघडताच पटेल उत्साहने म्हणाले,
“आओ आओ छोकरे. एकदम टॉप क्वालिटी मिरर बनाया तुमने, एकदम हाय मॅग्निफिकेशनपे भी मस्त चलेगा!”
मी चाट पडलो. मी शिव्या ऐकायच्या तयारीने आलो होतो तर हाती कौतूक आलं.
सुरवातीपासूनच मी अती काळजी घेतली होती. त्यामुळे एक उच्च दर्जाचा दुर्बीणीचा आरसा माझ्याकडून तयार झाला होता!
दुर्बीणीची नळकांडी घरी तयारच होती. छोटी मोठी जोडणी केली आणि दुर्बीण दुरच्या एका पिंपळाच्या झाडावर रोखली. एकच पान दुर्बीणीतून दिसत होतं. पानाला असलेलं एक छिद्र अगदी स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात कुठूनशी एक चिमणीच पाना समोरच्या फांदीवर येऊन बसली. तिच्या पिसातले बारकावे अगदी स्पष्ट पणे दिसत होते.
मी दगड फोडत होतो आणि शेजारी माझ्या नावाने खडे फोडत होते! म्हणून त्यांनाही दुर्बीणीतून दुरच्या वस्तू दाखवल्या. आग्रहाने न विसरता बोलवल्याने शेजारीही राग विसरून खूश झाले!
दुर्बीण बाहेर घेऊन जायचा तर इलाजच नव्हता. टपोरी, बेवडी पोरं मुंग्यांसारखी गोळा झाली असती, दात विचकून हसली असती. रात्री घराची काही कौलं काढली आणी दुर्बीण आकाशात रोखली आणी पहिल्यांदा शनी ग्रह आणि त्याची कडी पाहिली, काही दिवसांनी गुरू ग्रह आणि त्याचे चार चंद्र पाहिले. चंद्रावरची विवरं तर अगदी सहज दिसत होती. मृग नक्षत्रामधला ओरायन नेब्युला पाहिला.
काही दिवसांनी लाल डब्याचा यष्टीत टाकून दुर्बीण कोल्हापूरात गावाला नेली. घरामागच्या शेतात जाऊन पुष्कळ आकाश दर्शन केलं. गावाला खबरी फार लवकर पसरतात. एका रात्री गावतली सगळी म्हातारी कोतारी, लहान मुलं नि काही बाया सुद्धा आमचा घरी दुर्बीण बघण्यासाठी आल्या.
काही बायकांनी माझ्या आत्तीला विचारलं.
“काय आनलंय ग ते रमेसनं मुंबईतनं?”
“त्येला दुर्गुणी म्हनत्यात!”
माझ्या दुर्बीणीचं दुर्गुणी म्हणून नामकरण केलेलं पाहून हसू आलं.
त्या दिवशी आकाशात अष्टमी-नवमीचा चंद्र होता. सगळ्य़ांना दुर्बीणीतून चंद्र दाखवला. चंद्र प्रकाशामुळे गुरू ग्रह स्पष्ट दिसत नव्हता. आणि तो दिसला असता तरी त्याचं काही विशेष कुणाला नव्हतं. कुणी ऐकलंच नव्हतं त्याबद्दल तर त्याचं कौतूक कशाला? चंद्र मात्र सगळ्यांनी आवडीने पाहिला. अगदी नासालाही दिसल्या नसतील असा गोष्टी या मंडळींनी माझा दुर्बीणीतून पाहील्या. एका आजोबांना तर चंद्रावर काळ्या पाण्याचं तळंच दिसलं. असेल बुवा!
गावात बातमी झपाट्यानं पसरली. आमच्या जितकर भावकीतली एक ज्येष्ठ बाई, आम्ही तिला थोरली आई म्हणतो, तिला माझं दुर्बीणीचं प्रकरण समजलं. दुर्बीणीतून साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या कोणत्याही वस्तू दिसतात हे ही समजलं! तिचा एक जावई तिच्या नातवा सकट कुठे नाहीसा झाला होता. तिनं आपल्या लहान मुली कडून म्हणजे आमच्या माल्लाक्का कडून निरोप पाठवून दिला,
“माझं पोरगं तेवढं कुठं दिसतंय का बघ की रं तुझ्या दुर्गुणीतून!”
दुर्दैवाने मला दुर्बीणीतून थोरली आईचं पोरगं दिसलं नाही.
एका संध्याकाळी गावातील काही शिकलेल्या सवरलेल्या लोकांसाठी आकाशदर्शनाचा कार्यक्रम ठरवला होता. मावळण्या पुर्वीच दुर्बीण जोडून तयार ठेवली होती. तेवढ्यात पश्चिमेकडे लक्ष गेलं. योगायोगाने त्या दिवशी चंद्र आणि शुक्राची युती होती. चंद्राची बारीक कोर आणि त्याला चिकटुनच शुक्राची कोर असं सुरेख दृष्य दुर्बिणीतून दिसलं. दुर्बीणीचा पुरेपूर आनंद घेऊन मुंबईला माघारी आलो.
त्या दिवसापासून दुर्बीण त्या पोत्यात अशीच पडून आहे!



हीच ती माझी लाडकी दुर्बीण



हे असं पहायचं.

माझा जुना पुराणा SLR कॅमेरा दुर्बीणीला जोडून दुरच्या शेतातील मक्याच्या तुर्‍याचा फोटो


.

गुलाबाचे फळ

गुलाबाचे फळ

गुलाब इतके सुंदर असतात कि ती फार वेळ झाडावर राहत नाहीत. लगेच तोडली जातात. पण यामुळेच गुलाबालाही फळं लागतात हे बर्‍याच जणांना ठाऊक नसते. ज्यांना ठाऊक असते त्यांनी ती पाहिलेली नसतात.
काही दिवसांपुर्वी मी गावाहून एक गावठी (नेटिव्ह) जातीच्या गुलाबाची काडी मागवून घेतली. या नेटिव्ह जातींना सहज फळे धरतात. असंच एक फूल मी न तोडता झाडावरच राखून ठेवलं. फूल मावळल्यावर त्याच्या बुडाशी एक फळ धरले. पण या फळांना पिकण्यासाठी बरेच महिने जावे लगतात. मला तर सहा महिन्यंपेक्षा जास्त काळ जावा लागला. गुलाबाच्या पक्व फळा मध्ये व्हिटॅमीन सी प्रचंड प्रमाणात असतं अगदी संत्र्यापेक्षाही! चवीला याचा गर तसा आंबट होता.
वाचकांसाठी या गुलाबाचे फोटो टाकत आहे.
अधिक माहीती
गुलाबाच्या नवीन जाती अशाच प्रकारे तयार केल्या जातात. त्यासाठी "आई" झाडावर गुलाबाचे फळ राखून ठेवायचे. ते पुर्ण उमलण्यापुर्वीच त्याच्या पाकळ्या काढून ते फूल एका प्लॅस्टीकच्या पिशवीने झाकून ठेवायचे जेणेकरून त्यावर नको असलेल्या "बाप" फुलाचे परागकण पडून नयेत.आई फूलाचे स्त्रीकेसर पुर्ण तयार झाल्यावर त्यावरची पिशवी सोडून ठरावीक अश्या जातिवंत "बाप" फुलाचे पराग कण टाकावेत. नशीब चांगले असल्यास "आई" फुलाला फळ धरेल. नशीब आणखी चांगले असल्यास ते फळ टिकेल नि पिकेल. नशीब आणखी आणखी चांगले असल्यास त्यापासून तयार झालेले बी उगवेल. आणि शेवटी नशीब अती उच्च असले तर एखादी नवीन जातिवंत फुलाची जात तुमच्या नावावर नोंद होईल.
व्यवसाईक गुलाब उत्पादक "आई" आणि "बाप" फुलांचा जिनॅटीकल अभ्यास करून नवीन तयार होणार्‍या गुलाबाचा अंदाज बांधून कष्ट कमी करतात. उदा. हायब्रीड टी गुलाब हा टी गुलाब आणि परपेच्युअल गुलाबाच्या संकरातून तयार केला गेला आहे. या हायब्रीड गुलाबामध्ये सुद्धा रंग आणि इतर वैशिष्ट्या नुसार बरेच उपप्रकार आहेत.
दुर्दैवाने भारतिय हायब्रीडायजर ची संख्या नगण्य आहे. कारण संशोधनासारखी फालतू कामं करणं आम्हा भारतियांच्या स्वभावात बसत नाही.
मी सुद्धा शेवटी भारतियच म्हणून आपलं नुसतच गुलाबाचं फळ वाढू दिलं. आता बघू माझं नशीब कसं आहे ते.
फळाच्या बुडाशी तयार झालेलं फळ
raw fruit

पक्व झालेल फळ
rippen fruit

rippen fruit

पक्व फळाचा छेद

फळाचा छेद

फळातील बिया

फळातील बिया