Sunday, February 7, 2016

घरच्या घरी कचरा व्यवस्थापन Home Composting by Ramesh Jitkar

आजचा विषय "घरच्या घरी कचरा व्यवस्थापन". या विषयावर ढीगभर माहीती जालावर उपलब्ध आहे. पण मराठीतून तशी कमीच. पुस्तकेही बरीच उपलब्ध असतील पण त्यामधे सर्वसाधारण पणे हे असं करा, तसं करू नका अशा स्वरुपाचे लिखाण पहायला मला मिळालं. पण काय करायचं? आम्ही पडलो संशयी! लोकांच्या कपाळावर जसं गंध असतो तसा आमच्या डोक्यावर कायमचं प्रश्नचिन्ह असतं! आम्हाला कायम "का?" हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे सल्ल्यांनी भरलेलं पुस्तक सहसा माझ्या डोक्यात शिरतच नाही. मग स्वतः जालावर काही प्रश्नांची उत्तर शोधून आणि ती साध्या प्रयोगांनी पडताळून पाहीली. आणि मगच मनाचं काही प्रमाणात समाधान झालं. यातून जे काही थोडबहूत ज्ञान मिळालं ते इतरांपर्यंत पोहोचावं म्हणून हा लेख.
      तर घरच्या कचर्‍याचं व्यवस्थापन करायचं म्हणजे काय करायच? तर घरी तयार होणार्‍या जास्तीत जास्त कचर्‍याची घरच्या घरीच विल्हेवाट लावायची. ती कशी तर एक छोटासा खत प्रकल्प तयार करून.
आता प्रकल्प म्हटल्यावर जागा खुप लागणार का? शहरातल्या लोकांसाठी दोन बादल्या राहतील अशी ग्रिल मधील जागा पुरेशी आहे. एखादा टेरेस फ्लॅट असेल तर उत्तमच.
घरात साधारणपणे तयार होणारा कचरा साधारण पणे दोन भागात विभागता येऊ शकतो,
  1. ओला कचरा (पालेभाज्यांची देठं, खराब झालेली पानं, केळ्यांची साल वगैरे)
  2. सुका कचरा (वाळलेला पालापाचोळा, जुनी वर्तमान पत्रे, प्लॅस्टीच्या पिशव्या, बाटल्या, जुन्या इले़क्ट्रॉनिक वस्तू वगैरे)

आपण बोलणार आहोत ते मुख्यतः ओल्या कचर्‍याच्या व्यवस्थापना बाबत.
      बर्‍याच जणांना ठाउक असेल असा प्रकल्प म्हणजे दुसरं तिसरं काही नसुन कचरा एका भांड्यात साठवून ठेवून तो नैसर्गीक पणे कुजू द्यावा आणी शेवटी तयार होणारं खत घरच्या बागे मध्ये किंवा कुंडीमध्ये वापरावे.
पण कचरा घरात कसा कुजू द्यावा? शेवटी कुजणे म्हणजे घाण, किटक, दुर्गंध आणि जंतू, हे सगळं घरात कसं चालू द्यावं. त्यापेक्षा ते सरळ पालिकेकडे/शासनाकडे सोपवून द्यावं, असा एक सर्वसाधारण विचार असतो.
हा लेख असे प्रश्न पडणार्‍यांसाठी मुख्यतः आहे.
मुळात कुजणार्‍या वस्तू मधून का दुर्गंध येतो हे पाहू.
      एखादी वस्तू कुजते म्हणजे त्यातील क्लिष्ट पदार्थ एका मागोमाग एक अशा जैव रासायनिक विघटन प्रक्रियेतून जाऊन शेवटी रासायनिक दॄष्टीने काहीशा स्थिर असा ह्युमस नावाच्या वस्तू मध्ये परावर्तीत होते.
ही कुजण्याची प्रक्रिया अनेक प्रकारच्या जिवाणू, बुरशी, किटक, गांडूळ आणि इतर जिवांमुळे होते.
विघटनाचे दोन प्रकार आहेत.
  1. एरोबिक - ऑक्सिजनच्या उपस्थितीत होणारे विघटन
  2. अनएरोबिक - ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत होणारे विघटन.
हे विघटन करणार्‍या जिवाणूंनाही एरोबिक आणि अनएरोबिक जिवाणू असंच म्हणतात.
      यामधील अनएरोबिक विघटन होताना त्यातून सल्फर डाय ऑक्साईड सारखे दुर्गंधी असणारे वायू तयार होतात. त्यामुळे तुमच्या खताच्या भांड्यातून जर दुर्गंध येत असेल तर त्यामध्ये अनएरोबिक विघटन सुरु झालं असं समजावं. आणि म्हणुनच घरच्या खत प्रकल्पासाठी आवश्यक असतं ते एरोबिक विघटन, ज्यामधून दुर्गंधी येत नाहि. वास्तविक त्यामधून सुगंध येतो. हो, मी "सुगंध"च म्हणालो. पहिल्या पावसात मातीतून जो सुगंध येतो अगदी तसाच सुगंध एरोबिक विघटनातून येतो.
तर घरच्या कचर्‍याच एरोबिक विघटन कस करायचं ते पाहू.
      आपल्याला माहीत आहे हवेमध्ये ऑक्सिजन असतो. कचर्‍याला पुष्कळ हवा मिळत असेल, तर सहाजिकच त्यामध्ये नैसर्गीक पणे एरोबिक जिवाणूंची वाढ होईल. म्हणूनच जो डबा तुम्ही खत प्रकल्पासाठी वापराल त्याला पुष्कळ छिद्र असतील हे पहा. मी या कामासाठी जाळीदार प्लॅस्टीकचा ट्रे किंवा डबा वापरतो.
      आता आपल्याला कचर्‍यामध्ये जास्तीत जास्त एरोबिक जिवाणू तयार होतील हे पहायचं आहे जेणेकरून कचरा लवकरात लवकर कुजून जाऊ शकेल. जिवाणूंची संख्या वाढवायची म्हणजे त्यांच्या साठी पोषक वातावरण निर्माण करावं लागेल. जिवाणूंच्या वाढी साठी मुख्यतः कार्बन आणि नायट्रोजन या मुलद्रव्यांची आवश्यकता असते. कार्बन हा उर्जेचा स्त्रोत म्हणून वापरला जातो तर नायट्रोजन हा जिवाणूंच्या शरीर बांधणीसाठी आवश्यक असतो. मानवाला नाही का उर्जेसाठी कार्बोदके आणी शरीर बांधणी साठी प्रोटीन हवे असतात अगदी तसेच.
      सर्व प्रकारच्या कचर्‍यामध्ये मुलत: कार्बन आणि नायट्रोजन असतातच पण त्याचं प्रमाण (C:N ratio) हे कचर्‍या नुसार बदल रहातं. उदा. टाकाऊ हिरव्या भाजीपाल्यामध्ये हे प्रमाण १५:१ एवढं, तर वाळलेल्या पानांमध्ये हेच प्रमाण ५०:१ हे असतं. थोडक्यात हिरव्या पदार्थात तुलनेने नायट्रोजन जास्त असतो तर सुक्या पदर्थात कार्बन जास्त असतो. जिवाणूंच्या आदर्श वाढीसाठी हे प्रमाण ३०:१ असावे लागते.
CN Ration Chart
      तुमच्या खत प्रकल्पात जास्त नायट्रोजन असणारे पदार्थ (म्हणजे हिरवा कचरा) असतील तर जिवाणूंसाठी प्रोटीन भरपूर असेल पण त्यांना उर्जेसाठी कार्बनची कमतरता भासेल. अशा वेळेस पुर्ण नायट्रोजन सुद्धा वापरला जाउ शकत नाही कारण जिवाणूंची संख्या पुरेशी नसेल. अशा वेळी जास्तीचा नायट्रोजन अमोनिआच्या स्वरूपात बाहेर टाकला जातो आणि तुमच्या खत प्रकल्पाला आंबट, अमोनिआ सारखा वास येईल. हे टाळायचं असेल ओल्या कचर्‍याबरोबर सुका कचराही वापरणं आवश्यक आहे.
पण किती ओला कचरा आणि किती सुका कचरा वापरायचा जेणे करून एकून कार्बन आणि नायट्रोजनचं प्रमाण आवश्यक एवढं म्हणजे ३०:१ येईल? याचं एक साधं उत्तर शोधूया.
      हे बघा वर म्हटल्याप्रमाणे हिरवा कचरा जास्त झाला तर अमोनिआ निर्माण होइल जे आपल्याला नको आहे. पण जस्त सुका कचरा झाला तर काहीच फरक पडणार नाही. जो पर्यंत हिरवा कचरा उपलब्ध आसेल तो पर्यंत जिवाणूंची संख्या वाढेल आणी त्यासाठी काही प्रमाणात सुका कचरा उर्जेसाठी वापरला जाईल. हिरवा कचरा संपला की सुका कचरा फार तर पडून राहील. सुका कचर्‍याचं सुद्धा विघटन होईल पण त्यामधून दुर्गंध येणार नाही कारण सुक्या कचर्‍यात तुलनेने फार कमी नायट्रोन असतो आणि तो वापरण्यासाठी त्यामध्येच पुरेसा कर्बन सुद्धा असतो.
चला आता प्रत्यक्षात आपण आपला खत प्रकल्प कसा करायचा ते पाहू.
      एक जाळीदार डबा घ्यायचा. बाजारात दिवसभराचा कचरा साठवण्यासाठी जाळीदार स्टीलचे डबे मिळतात ते चालतील. किंवा जाळीदार प्लॅस्टीकचे ट्रे सुद्धा चालतील. अशा डब्याला तळाला सुद्धा छिद्र असतील हे पहावं. कचर्‍याचं विघटन होताना जास्तीचं पाणी निघून जाण्यासाठी याची आवश्यकता असते. डब्याच्या तळाशी तयार शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खताचा बोटभर जाडीचा थर द्यावा. या खतामध्ये आवश्यक जिवाणूंची सुरवातीची बॅच हजर असते. यांच्याच पुढच्या पिढ्या तुमचा खत प्रकल्प चालवतील. ओला किंवा हिरवा कचरा रोज तुमच्या स्वयंपाक घरात तयार होतोच. सुका कचरा म्हणून एखाद्या जवळच्या बागेमधून वाळलेली पान गोळा करून आणावीत. (मी या बाबतीत सुखी आहे. आमच्या नवी मुंबईत पुष़्कळ उद्यानं आहेत. मी अधून मधून आमच्या घरा जवळच्या बागेमधून एक बॅग भरून सुकी पानं आणून तयार ठेवतो)
      आपल्या स्वयंपाक घरात तयार होणारा ओला कचरा म्हणजे, पालेभाज्यांचे देठ, केळ्यांची साले, कोबीचा उरलेला भाग, भेंडीची कापलेली देठे इत्यादि इत्यादी रोजच्या रोज आपल्या खताच्या डब्यात टाकाव्यात. पण त्याच बरोबर साधारण पणे तितक्याच किंवा थोड्या जास्तच आकारमानाएवढी सुकलेली पानं सुद्धा ओल्या कचर्‍यात मिसळून टाकावीत. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. हो विघटना साठी कार्बन आणि नायट्रोजन बरोबरच पाण्याची सुद्धा आवाश्यकता असते. पण माझ्या अनुभवानुसार ओल्या कचर्‍यात पुरेसं पाणी असते. त्यामुळे अगदी थोडेसेच पाणी पुरेसे असते. पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यास हवेचा पुरवठा रोखला जाउन अनएरोबिक जिवाणूंची वाढ होण्यास सुरवात होईल. हा विघटन होणारा कचरा दर तीन किंवा चार दिवसांनी थोडा हलवावा जेणे करून पुन्हा एकदा हवेचा पुरवठा होऊन एरोबिक जिवाणूंना पुरक हवामान मिळेल. कचरा हलवताना घाण वास आला कि समजावं अन एरोबिक विघटन सुरू झालेलं आहे. याला साध उपाय म्हणजे सुका कचरा वाढवावा नि हवेचा पुरवठा वाढवण्यासाठी कचरा हलवावा.
      कचरा हलवताना मातीचा सुगंध आला कि समजावं तुमचा प्रकल्प योग्य मार्गाने जात आहे. जसा जसा पुर्वी टाकलेल्या कचर्‍याचं विघटन होत जाईल तसा तसा त्याचे आकारमान कमी होऊन तो खाली बसेल. अशा प्रकारच्या एका बादलीचा आकाराचा डबा एका कुटूंबाचा काही महिन्यांच्या किंवा वर्षाचा सुद्धा कचरा सामावून घेऊ शकेल.
      डबा भरत आला असं वाटलं कि तो काही दिवसांसाठी असाच ठेवून द्यावा आणी दुसरा डबा अशाच प्रकारे वापरण्यास सुरवात करावी. पहिल्या डब्यातील अर्धवट तयार झालेल्या खतामध्ये मात्र नियमित पाणी टाकून ओलसर पणा ठेवावा नि हलवावं.
या शेवटच्या टप्प्याला खाताचं क्युरींग प्रकिया असं म्हटलं जातं. ज्यावेळेस डब्यामधील कचर्‍यामध्ये कोणताच ओळखण्याजोगा कचर्‍याचा अंश रहात नाही त्यावेळेस क्युरींग प्रक्रिया पुर्ण झाली असं समजावं. पुर्ण तयार झालेलं खत हे काळसर तपकिरि रंगाचं आणी वासरहीत असते. हे तयार झालेलं कंपोस्ट खत आपल्या बागेमध्ये किंवा कुंड्यांमध्ये वापरावे.
काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

  1. तुमच्या खताच्या डब्यात कोणतेही शिजवलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ, दुधापासून तयार केलेले पदार्थ, मांसाहारी पदार्थ अजीबात टाकु नयेत. अन्यथा अळ्या, उंदीर यांचा उपद्रव होईल.
  2. शक्यतो फळांचे टाकाऊ पदार्थ वापरू नयेत. त्यातील गोड चवीमुळे मुंग्यांचा आणि विशिष्ट प्रकारच्या फ्रूट फ्लाईज यांचा त्रास होऊ शकतो. मला साध्या केळ्यांच्या साली मुळे सुद्धा फ्रूट फ्लाई़़जचा त्रास झाला.
  3. भाजीपाल्यांचा वापर उत्तम.
  4. सगळा कचरा बारीक कापून टाकल्यास फार लवकर कुजतो. नंतर कचरा हलवण्यासाही सोईचे होते.
  5. रोज टाकलेला ओला कचरा नेहमी सुक्या कचर्‍याने झाका. माश्यांचा त्रास होणार नाही.
  6. डबा झाकुनच ठेवा. माश्यांचा त्रास होणार नाही.
  7. सुका कचरा म्हणून काही जण वर्तमान पत्राचा कागद, किंवा पुठ्ठ्यांचे तुकडे वापरायचा सल्ला देतात. पण मी सहसा वापरत नाही कारण अशा कागदा मध्ये इतर अनेक रसायनं असू शकतात. शिवाय अशा कागदांमुळे कुत्र्याच्या छत्र्या खुप उगवतात.
  8. हा उपद्याप करताना "बायको" या प्राण्याचा प्रचंड त्रास होतो हा माझा अनुभव. कारण हा प्राणि ओला कचरा आणि सुका कचरा अजिबात वेगळा ठेवत नाही. तो वेगळा करण्यासाठी आपण स्वयंपाक घरात गेल्यास चिडचिडीचा सामना करावा लागतो. टाकाऊ भाजीपाला बारीक कापण्यासाठी तुम्ही सुरी घेतलीत तर या प्राण्याला त्याची त्याच क्षणी प्रचंड निकड असल्याचं जाणवतं. "या कामाला बरं नेहमी वेळ मिळतो, घरातली इतर कामं करू नका", असे टोमणे वरचेवर ऐकावे लागतात. कार्बन-नायट्रोजन प्रमाण आदर्श ठेवून एरोबिक विघटन करण्यासाठी आटोकाट प्रयत्न जरी केलेत तरी या प्राण्याला नेहमी तुमच्या खत प्रकल्पामधून घाण वास येतो. यावरचा उपाय मला आजून सापडलेला नाही.