Monday, September 22, 2008

माझा ट्रेकिंगचा अनुभव

दिनांक ०५/११/२००७ रोजी मी लिहिलेला अनुभव इथे चिकटवत आहे. प्रतिसादांची वाट पाहत आहे.

रोजच्या त्याच त्याच पणाचा कंटाळा आला होता. रोज सकाळी बरोबर सहा वाजता उठणं, ब्रश, आंघोळ, चहा, नश्ता, बस, ट्रेन, काम, बॉस.....च्यायला मनुष्य प्राण्याच्या जन्माला आलो म्हणुन इतका त्रास. अक्षरशः वीट आला होता या सगळ्याचा!

मागच्या फिरण्याला तब्बल पंधरा दिवस झाले होते! बापरे पंधरा दिवस!

नाही, आता बस! हा शनिवार रविवार कुठेतरी जायचच.

अभयला फोन केला.

"येणार का ट्रेकींगला या शनिवारी?", मी.

"ठीक आहे, कुठे जायचं?", अभयचं उत्तर.

"कर्जत ट्रेन पकडू, कुठे जायचं ते ट्रेनमध्ये ठरवू".

"ठीक आहे" असं म्हणुन अभयने फोन ठेउन दिला!

च्यायला, कुठे जायचं निश्चित नसताना हा मनुष्य तयार झाला? पक्का भटक्या आहे माझ्यासारखा!

गिर्यारोहणाच्या छंदाला माझ्या आणि अभयच्या दोघांच्याही घरून पाठिंबा नव्हता. आम्ही दोघं भाऊ, शिवाय मी काहीसा विक्षिप्त अशी घरात प्रतिमा म्हणुन मला फक्त पाठींबा नसायचा. विरोध करण्याचा भानगडीत साहसा कोण पडत नाही. याउलट अभयचं. तो त्यांच्या घरातला एकुलता एक वंशाचा दिवा. शिवाय वडिलांच्या धाकात राहण्याचा अभिनय करणारा. त्यामुळे त्याच्या घरुन गिर्यारोहणाला विरोध. अशा परिस्थितीत घरातून जेवणाचा डबा बांधून मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याच्या एखाद्या गावातून मिळणार्‍या वडापाव किंवा शहरातून बांधुन नेलेल्या स्लइस्ड ब्रेड आणि अमुल लोण्यावर दिवस साजरा व्हायचा!

पण त्या दिवशी ठरवलं. असं उपाशी पोटी नाही भटकायचं. स्वतः जेवण बनवायचं आणि सगळ्यांच्या नाकावर टिच्चून घेऊन जायचं. बसं ठरलं. मेनू ठरला तो म्हणजे साबूदान्याची खिचडी! माझी आई काय छान बनवते! नुसता विचार करुन तोंडाला पाणी सुटलं!

सकाळी लवकर उठायचं म्हणुन रात्री लवकर झोपलो. सकाळी उठल्यावर एक छोटीशी चूक लक्षात आली. साबुदाणे भिजत घालताना पाणी कमी टाकले होते. त्यामुळे साबुदाणे पुर्ण भिजले नव्हते.

पण अरे हॅट, या एवढ्या तेवढ्या चुकीने माघार घेणारा थोडाच आहे मी? दीड तासाने झक्कास खिचडी बनवून झाली! काही छोट्या छोटया चुका सोडल्या तर अगदी फक्कड झाली! चुका म्हणजे अगदी साध्या. साबुदाणे थोडे कच्चे होते, मीठ थोडं कमी होतं, मिरच्या सापडल्या नाहीत म्हणुन टाकायच्या रहुन गेल्या, शेंगदाणे भरडायचे होते, पण मिक्सर मघ्ये त्यांचं पार पीठ झालं, तेल थोडं जास्तच पडलं आणि बल्बच्या प्रकाशावर जेवण केल्यामुळे हळदीच्या पिवळ्या रंगाचा अंदाज आला नाही म्हणुन खिचडी पिवळी धमक झाली. बाकी खिचडी एकदम मस्त झाली! पण यावेळी तोंडाला का पाणी सुटलं नाही कुणास ठाउक?

या गडबडीत आंघोळ करायची राहून गेली! एक दिवस आंघोळ केली म्हणुन काय बिघडत नाही. अशा झक्कास खिचडीसमोर त्या आंघोळीचा काय विचार करायचा?

पाठीवर रकसॅक अडकवून निघालो. दादरला अभय भेटणार होता. उनातून चालणं नको म्हणून सकाळी लवकरच निघालो. नाहीतर दरवेळी आम्ही दहा वाजता निघतो! नेहमीप्रमाणे मला उशीर झाला होता. स्टेशनवरच अभयने माझ्या ऊशीरा येण्याबद्द्ल माझ्यावर तोंडसुख घेतलं.

कुठं जायचं हे अजुन ठरायचं होतं. थोडा विचार केला आणि ठरवलं माथेरानला लागुन असणार्‍या पेब किल्ल्यावर जाऊ. या किल्ल्यावर माझी दुसरी फेरी होती. अभय मात्र पहिल्यांदाच जात होता. साहजिकच त्याचा वाटाड्या मीच.

या किल्ल्यावर इतिहासात काही विषेश घडल्याचं वाचलं नाही. पण सुरेख आहे. पायथ्याला आदिवासींचे पाडे. शेवटचा पाडा सोडला की लहान टेकडीवरुन गडावरची वाट सुरू होते.

दिवस ऊन्हाळ्याचे होते. हा ट्रेकिंगसाठी चांगला ऋतू नव्हता. पण माझ्यातला मराठा काही स्वस्थ बसत नव्हता. मला म्हणत होता, मराठ्यांनी एवढया लढाया लढल्या आणि जिंकल्या त्या काय ऋतू पाहून केल्या काय? आम्ही सुद्धा त्याच मराठ्यांची औलाद आहोत! उन असु दे, पाऊस असु दे नाही तर अजुन काहीतरी असु दे. गड जिंकायचाच.

गडाच्या पायथ्याला पोहचायलाच नऊ वाजले होते. ऊन काही विशेष जाणवत नव्हतं. मस्त मजेत पाठीवरुन ओझं वगवित होतो. उर्जा साठवून ठेवण्यासाठी चालताना शक्यतो बोलणं टाळत होतो. जशी चढण सुरु झाली तसं पाठीवरची पाच किलोच्या रकसॅकचं वजन सहा किलोचं झाल्यासारखं वाटायला लागलं. एक मोठं झाड पाहुन त्याच्या थंडगार सावलीमध्ये थोडावेळ आराम करायचा म्हणून बसलो.

आजुबाजुला चिट्पाखरु नव्हतं, शहरी कानाला बोचणारी शांतता. फक्त पाखारांचा आवा़ज. अशा वेळी काही तरी विषय निघतो आणि अभयच्या गप्पा सुरू होतात. गप्पांच्या ओघात दोन तास कसे निघून गेले काहीच कळालं नाही. आणि मग "थोड वेळ थांब रे, निघू रे, थोडा वेळ बस तर खरं" असं करत करत दुपारचे बारा वाजले! पाखरांचा आवाजही थंड झाला. चांगलं टळटळीत उन झालं. अजुन अर्धी चढणही झाली नव्हती. सगळा कंटाळा झटकून पुन्हा चढण सुरु केली. पुन्हा तोंडं बंद. अर्ध्या तासातच घामानं अंग थबथबलं. पाठीवरच्या बॅगेचं वजन आता सोळा किलो झाल्यासारखं वाटायला लागलं. चढण पूर्ण करायच्या विचारात होतो. पण वाटेत पुन्हा एकदा एक मोठं झाड आलं! झालं! झाडाची थंडगार सावली, शहरी कानाला बोचणारी शांतता, एखादा विषय आणि अभयच्या गप्पा! इथेही चांगला पाऊण एक तास गेला!

माझ्यातला मराठा परत जागा झाला. हात् लेकानो, कसली आमची मराठ्यांची जात? मराठ्यांनी एवढया लढाया लढल्या आणि जिंकल्या त्या काय अशा थंडगार झाडाखाली आराम करुन? आम्ही सुद्धा त्याच मराठ्यांची औलाद आहोत! झाड असु दे, नाही तर अजुन काहीतरी असु दे. गड जिंकायचाच.

परत खांद्यावर रकसॅक अडकवली आणि चालायला सुरवात केली. इथून पुढची पायवाट घनदाट जंगलातुन होती. उन विरळ होतं. समोरच दिसणार्‍या इंग्रजी V आकाराच्या घळीपर्यंत जायचं होतं. ते़थून डाव्या बाजूचा कातळ चढून गेलो की गडावर पोहोचलो म्हणून समजा. झपझप पावलं टा़कत गडमाथा गाठला एकदाचा!

एवढा २२००-२३०० फुटांचा अजस्त्र पर्वत पण त्याच्या माथ्याचा विस्तार फार कमी. उत्तर दक्षिण विस्तार खुप आहे पण पुर्व पश्चिम जवळपास नाहीच. गडाची पायवाट पुर्वे कडुन आहे घळीपासुन पुढे आपण गाडाच्या पश्चिमेकडे जातो. या बाजूला एक गुहा आहे. या गुहेचा पुर्वी कशासाठी उपयोग केला जात असेल काय माहीत नाही पण आता कुण्या एका साधुमहारांजांचं आश्रम या गुहेत आहे. आश्रमाचे ट्रस्टीसुद्धा गडावर आले होते. आम्ही गेलो त्यावेळेस चुलीवर त्यांचं जेवण शिजत होतं. आम्हालाही जेवण्याचा आग्रह केला. आम्ही नम्रपणे नकार दिला. शिवाय आमच्या कडे आमची फक्कड खिचडी होतीच!

अभयकडे पाठ फिरवून बसलो आणि त्याला फक्कड खिचडी खाण्यास सांगितले!

इथे सावली पुष्कळ होती. थंडगार वारा होता. शांतता सुद्धा होती. पण एकांत नव्हता. त्यामुळे अभयच्या गप्पा रंगल्या नाहीत.

इथून पुढे काय? असा प्रश्न पडला. ट्रेक तसा मिळमिळीतच झाला होता. फक्कड खिचडी सोडली तर लक्षात राहण्यासारखं काहीच झालं नव्हतं. मग मला एक कल्पना सुचली. गुहेपासून पुढे जाणारी एक पायवाट सरळ माथेरानच्या पॅनोरमा पॉइंट खाली जाते हे माहीत होतं. पण. तेथून पुढे खाली कसं उतरायचं, किंवा माथेरानकडे कसं जायचं माहीत नव्हतं. गुहेतल्या एका नोकराकडे चौकशी करुन पायवाटे वरुन चालायला सुरवात केली.

दुपारचे तीन वाजले होते. वाट मळलेली नव्हती. पुष्कळ गवत उगवलं होतं. गवत सुकल्यामुळे पाय सरकत होते. आता या वाटेची भिती वाटू लागली होती. थोडं पुढे जाऊ, वाटेचा अंदा़ज घेऊ. काही धोका वाटल्यास आल्यावाटेनं परत माघारी जाऊ असा विचार करुन चालत राहिलो.

ही वाट आम्हाला एका मोकळ्या पठारावर घेऊन आली. अभय माझ्या बराच मागे राहीला होता. त्याची वाट पाहत थांबलो आणि पुढील वाटेचा अंदा़ज घ्यायला लागलो. पायवाट पुढच्या विशाल टेकडीच्या भिंतीला जाऊन भिडत होती. आणी इथून पुढे.... अरे बापरे! बघुन काळजात धस्स झालं! ही वाट अरुंद होत होत त्या टेकडीला समांतर जात होती. एका बाजुला टेकडीची भिंत मध्ये जेमतेम एक मनुष्य उभा राहू शकेल अशी वाट आणि दुसर्‍या बाजूला खोल अशी दरी!

एव्हाना अभय माझ्यापर्यंत येऊन पोहोचला होता. तो सुद्धा त्याच वाटेकडे पाहत होता. ती वाट फिरुन येत असल्यामुळे,आपली वाट तिच आहे हे काही त्याला ओळखता आले नाही.
त्याने अगदी सहज विचारलं, "ती अरूंद वाट पाहीलीस रमेश?, काय भयानक आहे नाही? कुठे बरं जात असेल ती?"

मी सुद्धा तेवढ्याच सहजतेने उत्तर दिले, "ती वाट माथेरान कडे जाते. आपण त्याच वाटेने जाणार आहोत".

"काय वेड बिड लागलं का तुला?, शेवटची ट्रेकींग नाही करायची आहे आपल्याला", अभयची अपेक्षित प्रतिक्रिया.

माझ्यातला मराठा परत तलवार घेऊन ऊठला!. हात् लेकानो, कसली आमची मराठ्यांची जात? मराठ्यांनी एवढया लढाया लढल्या आणि जिंकल्या त्या काय अशा वाटांना भिऊन? आम्ही सुद्धा त्याच मराठ्यांची औलाद आहोत! अरूंद वाट असु दे, नाही तर अजुन काहीतरी असु दे. माथेरान जिंकायचाच.

थोड्या कुरकुरीनंतर अभय सुद्धा तयार झाला.

अरुंद वाटेने तोल सावरत सावरत निघालो. सुर्य आग ओकत होता. तहान लागली होती पण पाणी चपापत्या उन्हामुळे फार गरम झालं होतं. पुढे ही वाट थोडी रुंद झाली होती. या पुढची चढण अगदीच कठीण होती म्हणुन कोण्या सामाजसेवकाने बांबूपासुन बनवलेली एक तकलादू शिडी लावली होती. घाबरत घाबरत ती सुद्धा पार केली! इथे येइपर्यंत दोघेही फार थकलो होतो. थोड्याच अंतरावर माथेरानच्या मिनीट्रेनचे रूळ दिसले. पूर्ण थकलेल्या अवस्थेत पुढचा रस्ता कसा असेल याचा विचार करु लागलो. तेवढ्यात माथेरानची मिनिट्रेन येताना दिसली, या ट्रेनची गती अगदी कमी होती.

अभयने आता आदेश दिला, " रमेश, ट्रेनमध्ये चाढायचं".

"अरे पण आपल्याकडे तिकीट नाही!"

"मरु दे ते तिकीट, ट्रेनमध्ये चाढायचं म्हटल्यावर चढायचं", अभय आता पेटला होता!

इतक्यात ट्रेन जवळ आली आणि गेली सुद्धा!

अभयने पटकन दुसर्‍या डब्यात उडी मारली होती. मला काही ते जमलं नाही.

अभय ट्रेनमधून आवाज देत होता, "अरे रमेश धावत ये आणि मागच्या डब्यात चढ."

मी सुद्धा मग काही विचार न करता ट्रेन मागे पळत सुटलो आणि सर्वात मागच्या डब्यात चढलो! हा डबा होता नेमका ट्रेन मधील गार्ड्चा!!!!

एवढ्या आडवाटेवर थेट गार्डच्या डब्यात एका अनोळखीला घुसताना पाहुन गार्डसुद्धा चपापला.

काही क्षणात तो सावरला. त्याचा पहिलाच प्रश्न, "तिकीट?"

याच बरोबर माझ्यातला मघापासुन माझी पाठ घेणारा मराठा चालत्या ट्रेन मधुन उडी टाकून जंगलात धूम पळुन गेला!!!

असं फैलावर घेतलं त्याने मला काय सांगू?

मुकाट ऐकून घेतलं त्याचं. च्यायला, तिकीट नव्हतं म्हणून, नाहीतर दाखवला असता माझा इंगा!

माझ्यावर यथेच्छ तोंड सुख घेतल्यानंतर ट्रेनमधून उतरवून दिलं. अभय सुद्धा मला पाहून उतरला. तो पर्यंत रानावनातुन सुसाट पळत सुटलेला माझ्यातला मराठा सुद्धा परत आला. आणी आम्ही माथेरान उतरून घरी परत आलो.

Labels:

2 Comments:

At September 23, 2008 at 12:27 AM , Blogger Unknown said...

ram bhau...changala upkram aahe chaludya..Abhinandan...!

 
At May 19, 2015 at 10:25 PM , Blogger Unknown said...

chan vatala vachun...

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home