Monday, September 22, 2008

प्राण्यांची बुद्धिमत्ता

दिनांक गुरू, ०५/१०/२००७ - ०८:५५ रोजी लिहिलेला लेख इथे चिकटवत आहे. प्रतिसादांची वाट पाहत आहे.

भोवती बर्‍याच प्राण्यांना पाहतो. घरातील मांजर, कुत्रा त्याच बरोबर जंगलातील हरणं, वानरं, माकडं,साप, खेकडे, बिबळ्या, पट्टेरी वाघ इत्यादी. मग मनात सहज प्रश्न येतो. या प्राण्यांना सुद्धा मनुष्यासारख्याच भावना असाव्यात काय? प्राणी कदचित आपल्या एवढ्या नसले तरी काही प्रमाणात तरी विचार करत असावेत काय?

यावरील शास्त्रीय लेखन मी वाचलेले नाही. पण प्राणी जीवनावरील मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगुळकर आणि जिम कॉर्बेट यांचं लिखाण भरपूर वाचलं आहे.

डिस्कवरी चॅनल वरील एका कार्यक्रमात एका वन्यजीव शास्त्रज्ञाने सांगितलं होतं कि, वन्यप्राण्यांमधे बुद्धीमत्ता, विचार करण्याची क्षमता वगैरे काही नसते. असते ती त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती. एखादा सिंह एखाद्या हरणामागे लपत छपत जातो. सावज झडपेच्या टप्प्यात येइपर्यंत इंचा इंचाने सरकत राहतो. आणि सावज टप्प्यात येताच त्यावर झडप घालतो. पण हे करण्यामागे त्या सावजाला आपलं अस्तित्व समजू नये हा हेतु नसतो. एखादं मेलेलं जनावर असेल तरी सिंह याच पद्धतीने त्याच्यावर झडप घालतो. प्राण्यांची वागणुक म्हणजे एक यांत्रिक प्रतिक्रियाच असते असं त्या शास्त्रज्ञाचं मत होतं.

आमच्या विभागात एक हौशी गॄहस्थ राहतात. त्यांना कोंबड्याची झुंज लावयचा नाद आहे. त्यासाठी त्यांनं कोंबडे पाळले आहेत. आणि त्यांच्या सोईसाठी कोंबड्यासुद्धा! तर हा कोंबड्यांचा परिवार कॉक कॉक करत हिंडताना मी नेहमी पाहत असे. दोन्ही पायांनी माती मागे सारून उघडे पडणारे किडे चोचीने टिपून खाण्याचा त्यांचा उद्योग कायम सुरू असे. एकदा एक गंमत पाहिली. सुरेश रावांनी कोंबड्यांपुढे ज्वारीचा एक ढीग ठेवला होता सर्व कोंबड्या त्या ढीगावर तुटून पडल्या. पण आश्चर्य म्हणजे त्या ज्वारीच्या ढीगात सुद्धा कोंबड्या मातीत असल्या प्रमाणे पायाने उकरीत दाणे टीपत होत्या! वास्तविक पुर्ण ढिगच खाद्याचा असल्याने त्यामध्ये उकरण्याचं काहीच कारण नव्हतं. म्हणजे आपण का उकरतोय तेच त्या कोंबड्यांना अवगत नव्हते! फक्त टीपताना पायाखालची जमीन उकरायची आणि खाद्य टिपायचं एवढंच त्यांना माहीत होतं. त्यामागे काय कारणे आहेत हे त्यांच्या गावीही नव्हतं!

अशा परिस्थितीत असंच म्हणावं लगेल कि प्राण्यांना बुद्धी नसावी. काही वेळा असंही वाटतं कि, शिकारीतला, आणि मारला जाण्यातला क्रूर पणा कमी करण्यासाठी निर्सगानेही काही व्यवस्था केली असावी. त्यासाठी प्राण्यांमधून प्रेम, वेदना, दुख:, या भावनाच काढून टाकल्या असाव्यात. एकूणच विचार करण्याची क्षमता नाहीशी केल्यावर हे सर्व आपसूकच साधू शकेल.

पण आमचे अनुभव मात्र निराळेच आहेत!

स्वयंपाक घरात कोणीही नसताना एका कोपर्‍यात ठेवलेल्या भांड्यातील नेमक्या दुधावर ताव मारण्याच्या मांजराच्या प्रवृत्तीला विचार न करता केलेली नैसर्गिक प्रवृत्ती कसे म्हणावे?

कोळिणीच्या डोक्यावरील टोपलीतून अलगद मासे उचलून नेणारा कावळा पिंड शिवताना मात्र तासनतास आपल्याला तिष्ठत ठेवतो. याला त्याची नैसर्गिक प्रवृत्ती कसे म्हणावे?

काही पक्षी सुद्धा एखादा कठीण कवचाचा प्राणी खाताना तो उंचावर नेऊन खाली टाकतात जेणेकरुन त्याचं कवच फुटावं आणि आतील प्राण्याला खाता यावं.

असे भरपुर अनुभव प्रत्येकाच्या गाठीला असतील. पण चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर आणि कॉर्बेट यांच्या अनुभवावरून तर पुरताच गोंधळ उडतो. हे अनुभव वाचल्यानंतर तर वन्य प्राणी निर्बुद्ध आहेत हा विचार कुठल्या कुठे पळून जातो!

जिम कॉर्बेट हा नावाजलेला खरखुरा शिकारी. नरभक्षक वाघांच्या शिकारी साठी रात्र रात्र जागवणारा. रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या काही केल्या शिकार्‍यांच्या बंदुकीच्या टप्प्यात येइना. अक्षरशः नऊ वर्षं रुद्रप्रयाग परिसरात त्याने दहशत माजवली. जिमच्या भाषेत सांगायचं तर त्याने संध्याकाळ नंतर संचारबंदीच लागू केली होती. लेकरा बाळांना सहज ओढून नेणार्‍या बिबळ्याचा प्रतिकार सोडाच पण मृतदेहाचा शोधही दुसर्‍या दिवशी सकाळीच इतर गावकर्‍यांबरोबर व्हायचा. दर काही दिवसांनी जवळपासच्या गावात हमखास शिकार करणारा बिबट्या जिमच्या मात्र वाटेला जात नसे. जिमलाही त्याने बरेच झुलवले. शेवटी जिमने गावकर्‍यांच्या वेशात शिकार करण्याचे ठरवले. आता असा प्राणी विचार करत नाही असे म्हणावे काय?

याविषयीचे चितमपल्लींचे अनुभव फारच आश्चर्यकारक आहेत! "वानरांची शेकोटी" या लेखात चितमल्लींच्या एका परिचितांचा अनुभव सांगीतला आहे. या परिचितांनी एकदा रानात वानरांचा एक कळप जंगलात काटक्यांच्या ढिगाभोवती बसलेला पाहीला. त्यांच्या सहाय्यकाने सांगितले की ती वानरांची शेकोटी आहे. दिवस थंडीचे होते. मुळातच वन्यजीव आगीला घाबरतात. शिवाय शेकोटी पेटलेली नसताना वानरांना उब कशी मिळते या प्रश्नांची उत्तरे सहकार्‍याला देता येईनात. पण त्याने सांगितले की या काटक्या आता पुन्हा पेटणार नाहीत. आणि तापासुन पाहता झालेही तसेच! आता वानरांच्या या कृतीमागे काहीतरी विचार असावाच की! यात कसली आली आहे नैसर्गि़क प्रवृत्ती?

हुदाळा (पाणकुत्रा, किंवा ऑटर) हा एक लहानसा दगड पोटावर घेउन पाण्यात पाठीवर तरंगत असतो. त्याच्या खाद्यापैकी ज्या वस्तु फोडाव्या लागतात त्या तो पोटावरील दगडावर आपटून खातो. दगडाचा अवजारासारखाचा उपयोग करणे ही बुद्धिमत्ताच नव्हे काय?

चितमपल्लींच्या अनुभावानुसार शाकाहारी वाटणारी हरणं सुद्धा कधी कधी मांसाहार करतात! एका हरणाने कासवाला खाताना त्यांनी पाहीलं होतं. कवचामध्ये पाय आणि डोकं लपवून बसलेल्या कासवाला बाहेर काढण्यासाठी हरणाने एक युक्ती केली. आपले पुढचे दोन्ही पाय कवचावर ठेऊन दाब दिला. त्याबरोबर आतील कासवाने डोकं बाहेर काढलं आणि हरणाने त्याला बाहेर खेचून खाल्लं.

एकदा तर चितमपल्लींनी काळ्या आणि लाल मुंग्यांची चक्क लढाई पाहीली! या लढाइत व्यवस्थित विचार करून आखलेल्या रणनीतीनुसार लाल मुंग्यांनी काळ्या मुंग्यांवर हल्ला केला. मनुष्य प्राण्याच्या युद्धात रक्ताचा आणि मृतदेहाचा सडा पडावा तसा काळ्या आणि लाल मुंग्यांच्या डोक्यांचा आणि धडांचा सडा पडला. लाल मुंग्या तावडीत सापडलेल्या काळ्या मुंग्याचं डोकं धडावेगळं करुन समाचार घेत होत्या. हे सर्व कशासाठी तर काळ्या मुंग्यांच्या वारुळातील अंड्यांसाठी! या अंड्यातील निघणार्‍या काळ्या मुंग्यांचा वापर लाल मुंग्या गुलाम म्हणुन करत असल्याचं चितमल्लींचं निरीक्षण आहे! आता या मुंग्यांना निर्बुद्ध कसे म्हणावे?

हे आणि इतर अनुभव तर असेच सांगतात की वन्यप्राण्यांकडे मनुष्यापेक्षा एक वेगळी शक्ती असावी!

3 Comments:

At February 27, 2009 at 5:16 AM , Blogger प्रतिक ठाकूर said...

रम्या छान लेख. आवडला.
आजच मिपा वर तुझ्या अनुदिनीची लिंक मिळाली.
लिहित रहा.
-गणपा.

 
At August 3, 2009 at 5:24 PM , Blogger Rajeev Upadhye said...

Good observations and article is good too...

 
At May 28, 2021 at 2:19 AM , Blogger विचारमंथन said...

छान लेख आवडला.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home