Saturday, October 7, 2023

 एक मधाळ अनुभव


आज कधी नव्हे तो सोसायटीचा हणमंत वाँचमन ड्युटीवर असताना उभा होता. डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताच्या अंगठ्याने तंबाखू चोळत कंपाउंड जवळच्या एका झाडाच्या शेंड्यावर एकटक नजर लावून होता. बाजूला दोन्ही हातानी एक दांडकं उभं पकडून दोन पायांवर परसाला बसल्या सारखा विष्णू शिपाई निवांत बसला होता.

सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला साजेशा तुसडेपणाने मी डाफरलो, "सुट्टीवर आहात का चेअरमन साहेब?"

सोसायटीच्या वाँचमनला साजेशा बेफिकीरपणे तो उत्तरला, "डिवटीवरच हाये साहेब. ते बघितलं का मधल्या फांदीवर? मोहोळ बसलंय", तंबाखू चोळण्याचे काम न थांबवता नुसत्या नजरेनेच दिशा दाखवीत हणमंतराव म्हणाले.
मी बारीक नजर करत झाडाकडे बघत राहिलो.

मी काही बोलणार एवढ्यात आपल्या सिनियर वाँचमनची प्रत्येक गोष्ट खोडून काढायची सवय असलेला विष्णू शिपाई म्हणाला, "मग असू दे की, तू बी बस की निवांत  डिवटी करत".

"साहेब, मध भरल्याला हाये. गॅरंटी देतो", माझ्याकडे बघत आणि सवयीने विष्णुकडे पूर्ण दुर्लक्ष करत हणमंत म्हणाला.

"मग काय बेंडबाजा आणावा म्हनतोस?", विष्णू आपल्या सिनियर कडे बघत नम्रपणे म्हणाला.

"मध काढाय पायजे", माझ्याकडे बघत हणमंत म्हणाला.

"का? जगायचा कटाळा आला व्हय?", विष्णू शिपाई पुन्हा शांत सुरात म्हणाला.

"चार वाट्या भरून मिळेल", माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा करत हणमंत म्हणाला. पण तशी अपेक्षा विष्णू शिपायाची अजिबात नव्हती. आपल्या सुरात पुरेसा निवांतपणा ठेवत विष्णू म्हणाला, "आणि मध काढून काय करायचा?"

"तुझ्या मढ्यावर वतायचा", आता मात्र हणमंत चिडला.

"आणि माश्या चावल्या म्हणजे?" पुन्हा शांत सुरातला प्रश्न.

या सर्व प्रकारावर काय बोलावे हे मला न समजल्याने मी काहीही न बोलता एकदा हणमंतच्या तोंडाकडे तर एकदा विष्णुच्या तोंडाकडे बघत हा सारा संवाद ऐकत होतो.
वास्तविक, चार वाटी भरून मध मिळणार, हे ऐकून माझ्या अंगात अचानक उत्साह संचारला होता. पण विष्णूचा प्रश्न रास्त होता.
परंतु काही झालं तरी हणमंत ही एक मोठी असामी होती. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यासमोर गेट उघडा ठेवून केबीनमध्ये खुर्चीवर तासंतास बसून निर्विकारपणे तंबाखू चघळण्याइतकं त्याचं व्यक्तिमत्त्व उत्तुंग होतं. हाताखालच्या शिपायाने केलेल्या साध्याशा प्रश्नाने डळमळीत होणाऱ्यापैकी तो नव्हता. 

आपल्या ठाम सुरात तो कडाडला, "आज्याबात चावनार न्हाईत त्या माश्या"

"कोण म्हणतं?"

"मी म्हणतो"

"कशावरनं?"

"नीट बघ, ती निराळी जात आहे, चावत न्हाईत त्या माश्या"

"पण कशावरनं ते सांग की"

"लेका, तुझ्या पेक्षा पाच वर्षांनी शिनेर हाय मी. आत्मइस्वास हाय. पटंत नसंल तर सायबास्नी इचार"

हणमंतरावांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी सुखावलो.

हणमंत पाच वर्षांनी सिनियर असल्याने मधमाशांची जात निराळी आहे त्यामुळे त्या चावणे शक्य नाही एवढी साधी गोष्ट त्या विक्षिप्त आणि संशयी विष्णूला समजू नये याचा मला फार राग आला.

शेवटी मी त्या उद्धट विष्णुवर डाफरलो, "विष्णू, कळत नसेल तर शांत बसावं आपण ज्युनिअर माणसाने. उगाच मधे मधे तोंड घालू नये. असे घाबरून तर अजिबातच जाऊ नये. सेक्युरिटीला शोभत नाही हे."

विष्णू शिपाई वरमला.

असे पाठबळ मिळाल्याने हणमंतला जोर आला, "सायेब, आज्याबात काळजी करू नका, ते फुडचं काय करायचं ते मी बघून घेतो. तुमचा आशीर्वाद ऱ्हावू द्या झालं."

हणमंतच्या मनात माझ्या बद्दल अपार आदर आहे हे पाहून मला भरून आलं.

एव्हाना आमच्या भोवती सोसायटीतील इतर मंडळी गोळा झाली होती. त्यात जुन्या परंपरांचा पराकोटीचा अभिमान असणारे धोतरेकाका होते. वास्तविक धोतरेकाका हे त्यांचे मूळ नाव नव्हते. पण त्यांच्या धोतर प्रेमाची मनसोक्त टवाळी करणाऱ्या काही आदर्श मुलांनी त्यांचे पुन्हा बारसे केले होते. त्यासोबत कायम हाफ चड्डीत राहणारे कांबळे काका होतेच.

सर्वांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. एखाद्या समारंभाची तयारी सुरू व्हावी तशी लगबग सुरू झाली. एकाने झाडावर चढण्यासाठी कुठून तरी एक शिडी पैदा केली. चार वाट्या मिळणारा मध घेण्यासाठी पाच पंचवीस जण वाट्या घेऊन झाडाखाली तयार होते.
शेवटी मी स्वतः झाडाला शिडी लावून उभा राहिलो आणि सगळ्या जमलेल्या समुदायाचे मनोधैर्य टिकून राहण्यासाठी एक छान भाषण ठोकलं. जीवनात काहितरी मिळवण्यासाठी कष्ट करणे कसे आवश्यक आहे हे सांगितले. हणमंतराव स्वतः झाडावर चढणार असल्याने त्यांचे जाहीर कौतुक केले. न चावणाऱ्या माश्या असल्याची खात्री आधीच हणमंतला असल्याने त्याला अजिबात काळजी नव्हती. त्यामूळे इतरांना ती असण्याचे मुळीच कारण नव्हते.

विष्णू शिपाई सुद्धा आपलं दांडकं घेऊन पवित्र्यात उभा राहून म्हणाला,  "काळजी नगो, माश्या आल्याच तर एकेकाच्या ढुंगणावर अश्या काठ्या हाणतो की बघाच. सगळ्यांच रक्शन करतो मी."

आता विष्णू शिपाई एकेका मधमाशीला धरणार कधी, त्यांचं ढुंगण शोधणार कधी आणि त्यावर काठी हाणणार कधी असे फालतू प्रश्न ना त्याला पडले ना आम्हाला. धुंदीच अशी विलक्षण चढली होती.

शेवटी सगळी तयारी झाली, सगळे वाटी धारक वाट्या सरसावून झाडाखाली उभे राहिले. हणमंत वाँचमन सरसर शिडी वरून झाडावर चढाई करून गेला आणि नशेत असल्याप्रमाणे मोहोळ असलेली फांदी गदागदा हलवून मोकळा झाला.

आणि व्हायचं तेच झालं! भयानक हल्ला!

सगळ्या मधमाश्या हणमंतच्या शिनेरिटीचा अजिबात सन्मान न करता आणि त्या न चावणाऱ्या माश्या असल्याच्या हणमंतच्या मताची अजिबात कदर न करता त्याच्यावर चालून गेल्या. 

झाडाखालाच्या मंडळींचं मधमाश्यांकडे लक्ष जाण्याआधीच मधमाशांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि एक तुकडी या मंडळींवर चाल करून गेली. हातातल्या असंख्य वाट्या जमिनीवर पडल्याचा टणटणाट झाला आणि पुढच्याच क्षणाला असंख्य माणसांचा बेंबीच्या देठापासून एकाच वेळी रडण्याचा आवाज झाला. अचानक दंगा झालेला पाहून जवळची कुत्री भुंकू लागली, झाडावरचे कावळे काव काव करू लागले. झाडाखाली पळापळ सुरू झाली. काही जण रडत रडत पळत होती, उरलेली पळत पळत रडत होती. जे पळताना पडत होते ते पडल्या पडल्या रडत होते.

तरीही झाडावरचा एक माणूस रडण्यामध्ये झाडाखालच्या असंख्य माणसांना मागे टाकत होता.

खिडकीच्या बाहेर डोकं काढून काही जण सुरवातीला मजा बघत हसत होते. ते मधमाश्यांना अजिबात सहन झाले नाही. मधमाश्यानी त्यांना सुद्धा सोडले नाही. शेवटी ती मंडळी सुद्धा खिडक्या बंद करून आपापल्या घरात हुई हुई करत रडत बसली.

धोतरेकाकांची मात्र दयनीय अवस्था झाली. त्यांचं ते पारंपरिक प्रेम त्यांना मुळीच पळू देत नव्हतं. पायात येणारं धोतर त्यांना सारखे पाडत होतं.

कांबळे काकांची समस्या निराळी होती. त्यांच्या हाफ चड्डीमुळे मधमाश्याना चावण्यासाठी विस्तिर्ण प्रदेश उपलब्ध झाला. मधमाश्या सभ्यतेचे सगळे नियम मोडून कांबळे काकांना चारचौघात चावू नये तिथे चावल्या आणि कांबळे काका एकटे असताना सुद्धा रडणार नाहीत तसे चारचौघात रडले.

पण या सगळ्या रडारडीत आवाजात विष्णू शिपायाचा आवाज नव्हता कारण हातातलं दांडकं तिथंच टाकून तो चतुर माणूस सुरवातीलाच पसार झाला होता.

मी मात्र त्या विष्णू सारखा हातातील वस्तू टाकून मुळीच पळालो नाही. त्या ऐवजी हातातली शिडी सोबत घेऊनच  पळालो.

खांद्यावर शिडी घेऊन पळत जाणाऱ्या माझ्या मूर्ती कडे पाहत तो हणमंत नामक दुर्दैवी प्राणी, आता उतरायचं कसं, अशा विवंचनेत हातपाय झाडंत जगातल्या सर्व नृत्य प्रकारात नाचला, जगातल्या सर्व गायन प्रकारात रडला आणि शेवटी सर्व कलांनी समृद्ध झाल्यावर झाडावरून सोसायटीच्या भिंतीवर आणि भिंतीवरून पलीकडच्या प्लॉटवर उडी टाकून या आसमंतात अंतर्धान पावला.

असाच काही वेळ गेला आणि मी खांद्यावर शिडी वागवीत सोसायटीत परत आलो.

हातात दांडूकं घेऊन विष्णू शिपाई दोन पायांवर काही घडलेच नाही असा चेहरा करून आपल्या एका जाड्या मित्रा सोबत बसला होता. खांद्यावरची शिडी त्याच्या समोर टाकून मी ओरडलो,

"नालायक, पळून गेलास? आमचं रक्षण करणार म्हणे"

"माश्या चावू नये म्हणून पळालो सायेब, परत येऊन रक्शन  करनारच होतो."

"चुप्प बैस, एवढी मोठी घटना घडली आणि तू या दोस्ताबरोबर चकाट्या पिटत बसला आहेस? काय बोलावं तुला! आणि तो तुझा दीडशहाणा सिनियर कुठे आहे?"

तो जाड्या गृहस्थच तोंडात सुपारी धरल्यागत आवाज काढून म्हणाला, "मीच हनम्या न्हवं काय हितं बसलोय, सुजल्यामुळं वळखु ईना झालोय. तुम्ही शिडी घेऊन पळून गेला तवा...."

त्याला पुढं बोलू ना देता मी ओरडलो, "शांत बस. एक शब्द बोलू नकोस. न चावणाऱ्या मधमाशा म्हणे! काय पण सिक्युरिटी ठेवली आहे आम्ही. तरी मी म्हणत होतो पोळ्याला हात लावू नकोस. पण ऐकशील तर शपथ. कोणी मेलं बिलं असतं म्हणजे केवढ्याला पडलं असतं? गाढव माणूस."

झाडाखाली काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेण्यासाठी गेलो. 

झाडाखाली भर दुपारी भयाण शांतता होती. आजूबाजूच्या सर्व घरांच्या खिडक्या बंद होत्या. भुंकून भुंकून दमलेली कुत्री निवांत बसली होती. कावळे सुद्धा शांत दांडीवर बसले होते. चार पाच मधमाश्या गुणगुणत होत्या. जमिनीवर होत्या फक्त तुटक्या चपला, असंख्य रिकाम्या वाट्या आणि धोतरे काकांचं सुटलेलं धोतर!

- रमेश जितकर

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home