Wednesday, October 29, 2008

सेनापती कापशी

यावर्षीच्या दिवाळीत काही कामानिमित्त कोल्हापूरला जाणं झालं. कोल्हापूर स्थानकावर पुढारी वर्तमानपत्र घेतलं. पहिल्याच पानावर बातमी होती "सेनापती कापशीत अमूक अमूक घडले". बातमीत "सेनापती" या शब्दाचा काही अर्थ लागेना. थोडा विचार केला नि सोडून दिलं. सी.बी.एस. ला गारगोटी बस पकडून गावी आलो.
दिवसभराची कामं उरकून रात्री आनंदा वारके यांच्याकडे गप्पा हाणायला आलो. नात्यानुसार हे माझे मामा. पण मी त्यांना दादा म्हणतो. व्यवसायाने मराठीचे प्रोफेसर. फार गप्पिष्ट माणूस. बंगल्याच्या दारातली लाईट मुद्दाम घालावली. गावरस्त्यावरील विजेच्या दिव्याच्या अंधूक प्रकाशात संगीत, लेझीम याच्या गप्पा रंगल्या. एवढ्यात कोणीतरी आलं. इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि आनंद दादांच्या तोडून एक वाक्य निघालं, "सेनापती कापशीत उद्या आरोग्य शिबीर आहे...". त्या दोघांमधील संभाषण सुरू होतं. मी विचार करत राहीलो. गावाचं नाव कापशी. पण मग त्याला 'सेनापती' का म्हणत असावेत?
दुसर्‍या दिवशी पुन्हा कोल्हापुरात जायला निघालो. यष्टी साठी तासभर थांबण्याची तयारी नव्हती म्हणून वडाप मध्ये बसलो. इतर ठिकाणचं माहीत नाही पण कोल्हापूरात वडाप हे फार मजेशीर प्रकरण असतं. जीप, ओम्नी किंवा तत्सम गाडीत ड्रायव्हर बसलेला असतो. गावं येत जातात आणी प्रवासी वडापमध्ये चढत जातात. प्रत्येक गावात प्रवासी चढला कि आपल्याला वाटतं हा या गाडीत चढू शकणारा शेवटाचा प्रवासी. पण लगेच पुढच्या गावात एक नवीन प्रवासी चढतो आणि कशी कोण जाणे पण त्याला गाडीत बूड टेकायला जागा मिळते. इतर प्रवासी काही तक्रार करीत नाहीत. शेवटी एक वेळ अशी येते की दरवाजाकडे बसलेले प्रवासी एक पाय गाडीबाहेर काढून अर्ध्या ढुंगणावर बसतात. लहान पोरं ठोरं आईबापाच्या मांडीवर बसतात. स्वतःच्या आणी दुसर्‍यांच्या सुद्धा! खुद्द ड्रायव्हर साहेब अर्ध्या ढुंगणावर वाकडा बसलेला असतो. गियर, क्लच, ब्रेक आणि सूकाणू पर्यंत पोहचता यावं एवढीच माफक अपेक्षा असते बिचार्‍याची. असं हे फुल्लं शिटा भरलेलं वडाप कोल्हापूर शहराच्या दिशेनं सुटतं. रस्त्यात कितीही दगड खड्डे असले, वडापने कितीही हेलकावे खल्ले तरी तुम्हाला तुमच्या शिटवर टिकून राहीलं पाहीजे. नाहीतर तुम्ही वडापमधून प्रवास करण्यासाठी सर्वस्वी नालायक आहात हे खूशाल समजावे! गाडीत गप्पा सुरू होतात नाहीतर वडापमध्यल्या रोम्यांटीक गाण्यामधे दंग होऊन जायचं.
माझ्याबरोबर आनंद दादा होते. काल रात्रीची शंका विचारली,
"हे सेनापती कापशी काय आहे?", मी.
"गावाचं नाव".
"पण मग गावाच्या नावाला सेनापती का जोडलं?".
"तुमचं कोण ते संताजी कापशीतलंच न्हवं का", प्रोफेसरांनी बोलण्यामधे ग्रामीण बाज जिवंत ठेवला होता.
"कोण संताजी घोरपडे?"
"व्हय तेच".
मी भलताच खूश झालो. माझा आवडत्या विषयावरची माहीती मिळाली. गावाला गप्पा हाणायला ओळख असण्याची आवश्यकता नाही. आपण शहरी माणसेच प्रत्येकाला संशयाच्या चष्म्यातून पाहतो. बाजूला नाधवड्याचा माणूस बसला होता. त्यानेही गप्पात भाग घेतला.
"कापशीत संताजी घोरपड्याचा वंश राहतोय. पाचवी का सहावी पिढी आसंल".
"त्यांची आताची पिढी सुद्धा सेनापतींसारखे राहतात का?" माझा प्रश्न.
"तर वो. राजंच ते. नेमबाजीत लई हुशार. अजून बी शिवारात कुनी नेम धरून डुकार मारलं तर लोक म्हनत्यात नेम लई अचूक हाय पठ्ठ्याचा जनू याला कापशीकरानं काढलाय". सार्वजनिक जागेत शिवराळ भाषा वापरण्यात त्या गॄहस्थाला काहीच वाटत नव्हतं. ऐकणार्‍यानाही त्याचं काही वाटत नव्हतं. रांगड्या प्रदेशातील रांगड्या माणसांची भाषासुद्धा रांगडीच. सदाशिव पेठी लोकांना कदाचित हे रूचणार नाही. पण आम्हाला मात्र त्या शिव्यांचाही अभिमान!!
मी आनंद दादांना म्हणालो आपण कापशीला जाऊच. आनंद दादा तयार झाले.
वेळात वेळ काढून आनंद दादा, त्यांची दोन लहान मुलं आणि मी असे चार जण मोटारसायकल वरून निघालो.
वाटेत घाटगे घराण्याचे विद्यमान राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या मालकीचा अवाढव्य तलाव पाहिला. त्यांच्या कित्येक एकर शेतीला पाणी पाजण्यासाठी म्हणून घाटगे राजांनी हा तलाव बांधला.


तलावाच्या तीन बाजूंना शेती आणि एका बाजूला एक हिरवीगार टेकडी. टेकडीच्या पायथ्याचा परिसर तर अगदी सिनेमातलं शुटींग करण्याजोगा! पाऊस जाऊन फार दिवस झाले नसल्यामुळे टेकडीच्या पायथ्याची तलावाला भिडलेली जमिन हिरव्यागार गवताने झाकलेली होती.



दुपारचे बारा वाजायला आले असले तरी तलावाच्या गार पाण्याने आसमंतात मंद असा गारवा होता. तलावाचं अप्रतिम सौंदर्य कॅमेर्‍यात साठवलं. कापशी सात-एक किलोमिटर दूर होतं आणि वेळही तसा बराच शिल्लक होता. म्हणून मोटारसायकल हळूहळू चालवित निघालो. इथं रस्त्याच्या एका बाजूला उथळ दरी होती. दरीचा उतार झाडांनी व्यापलेला. एकदम खाली एक धनगर आपल्या काळ्या-पाढंर्‍या शेळ्या चारीत होता. उजव्या बाजूला पठारावर कसलंसं मंदिर दिसलं. गाडी थांबवून दर्शनाला गेलो. उनाच्या कारातून आल्याने देवळातील थंड लादी पायांना सुखावत होती. दोन तास तिथंच ताणून द्यायची इच्छा होती. पण मोह टाळला. मंदिर लक्ष्मीचं. एका बाजूला काळ्या दगडातील विठ्ठल-रखूमाई तर दुसर्‍या बाजूला शंकराची पिंडी. पिंडीवरल्या नागाने लक्ष वेधलं. बहूतेक ठिकाणी पिंडीला वेटोळे घालून वरती फणा उभारलेला पितळी नाग दिसतो. इथला नाग मात्र पिंडीच्या एका बाजुला होता.



ती एक लांबलचक मुळीच असल्यासारखं वाटलं. एकदम एकसंध. कुठेही जोड दिल्याचं दिसलं नाही. समतोल साधण्यासाठी नागाला एक सुरेख बाक दिला होता.



त्याचं सौंदर्य पाहून छायाचित्र घ्यायचा मोह काही आवरला नाही.
इतक्यात कुठूनतरी माणसांचा मोठा घोळका आला. कित्येक बाया, बाप्ये आणि त्यांची मुलं. कुठल्याश्या वेगळ्याच भाषेत बोलू लागली. लहान मुले विठ्ठलाभोवती, पिंडीभोवती गोळा होऊन बोलू लागली. एकच कालवा झाला. देवळातल्या एकानं सगळ्यांना दम देऊन शांत केलं. आम्ही निघालो.
कापशी गावात पोहोचलो. गाव तसं बर्‍यापैकी मोठं. गावात मोबाईल फोनचे दोन टॉवर होते. एका छोट्याश्या हॉटेलात लस्सी पिताना मालकाकडे संताजी घोरपडेंच्या वंशजांची चौकशी केली. उदय घोरपडे आणि राणोजी घोरपडे हे आता संताजी घोरपडेंच्या वाड्यात रहात असल्याचं मालकांनी सांगितलं. हि पिढी आता राजकारणात आहे. राणोजी हे नाव ऐकून मला कुठंतरी वाचलेली माहीती आठवू लागली.
शिवाजी महारांजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांना बर्‍याच जणांनी विरोध केला. फक्त क्षत्रियच राजा होऊ शकतो असा नियम होता त्या काळात. जातियता शिवरायांसारख्या युगपुरूषालाही चुकली नाही हेच आमच दुर्दैव! हा विरोध करताना महाराजांचा पराक्रम ते लोक पार विसरुन गेले. आश्चर्याची बाब म्हणजे या विरोधकांमध्ये राजांच्या राज्यकारभारात मोलाचे कार्य करणारे आण्णाजी दत्तो सुद्धा सामिल होते! महाराजांच्या मॄत्यूनंतर हेच आण्णाजी दत्तो पुढे शंभू राजांचे कट्टर विरोधक बनले. अगदी संभाजी राजांना अटक करण्याचा हुकूम काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली. म्हणजे महाराजांच्या संपर्कातील लोक अशी सर्वसामान्यच होती. त्यांच्यातही क्रोध, मत्सर, तिरस्कार, संधीसाधूपणा असे गुण-अवगुण होते. या अशा लोकांना बरोबर घेऊन शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं यातच त्यांचं संघटन कौशल्य, नेतॄत्वगुण दिसून येतात. राज्याभिषेक सुरळीत पार पाडण्यासाठी भोसले घराण्याचा वंशवॄक्ष तपासण्यात आला. त्यातून महाराजांचे पूर्वज हे रजपूतांच्या सिसोदिया घराण्यातले असल्याचे सिद्ध झाले आणि राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्याकाळच्या एका प्रवाशाने सुद्धा महाराज हे अस्सल रजपूतांसारखे दिसतात असं लिहून ठेवलं आहे. घोरपडे, घाटगे ही राजघराणी म्हणजे याच रजपूत वंशवॄक्षाच्या फांद्या. ही पुर्ण वंशांवळ मला कुठल्यातरी पुस्तकात मिळाली.
राणोजी घोरपडे, विक्रमसिंह घाटगे ही नावं सुद्धा रजपुतांचा अंश अजूनही कुठेतरी असल्याचं दर्शवित होती.
चौकशी करत वाड्याकडे आलो. अपेक्षेप्रमाणे वाड्याची पडझड झाली होती.



वाड्याभोवती चोहोबाजूंनी दगडी तटबंदी होती. चोहोबाजूंनी वाड्यावर अतिक्रमण झालं होतं. वाड्याभोवतालची तटबंदी तोडून तिथे अनेकांची घर, कचेर्‍या दिसत होत्या. एका मंदिराचा दरवाजा तटबंदी तोडून बनवला होता आणि मंदीर पुर्ण वाड्यात होते.
आम्ही तटबंदीच्या कमानीतून आत गेलो तर वाड्यातली दोन पाळीव कुत्री भुंकू लागली. काही पावलं पुढे टाकली तर अंगावर धावून आली. तेवढ्यात वाड्यातून कोणी मुलगी बाहेर आली. आमचा वाडा पाहण्याचा इरादा तिला सांगितला, तर म्हणाली मुख्य वाडा तोडून आम्ही नवीन वाडा बांधत आहोत. त्यामुळे मुळ वाड्यातले पाहण्यासारखे काही उरले नाही. मी निराश झालो. मध्यभागात जुन्या दगडी वाड्याचे काही भग्न अवशेष दिसत होते. आणि मध्येच सिंमेंट-कॉंक्रीटचं अधर्वट असलेलं बांधकाम आणि पुढ्यात एक आलिशान चार चाकी गाडी.



आनंद दादांनी तिच्याकडे तगादा लावला,
"अहो आसंल तेवढं तरी पाहून जातो".
"अहो पण काही नाहीच आहे तर काय पाहणार?".
"तरी पण जेवढं आसंल तेवढं..." असं म्हणत आनंद दादा खुशाल वाड्याबाहेर ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसले.
इतक्यात उजव्या बाजूच्या खोलीतून राणोजी घोरपडे बाहेर आले. पाठीचा कणा एकदम ताठ. सदरा आणि लेंगा घातलेला. आमच्याकडे फक्त काही क्षणच नजर टाकली. खुर्चीवर बसता बसता शांतपणे म्हणाले,
"काय सांगितलं तिनं ऐकलं? वाडा दाखवत न्हाई म्हनून सांगितलं न्हवं एकदा. का अजून काय येगळं सांगितलं?".
राणोजींच्या आवाजात जरब होती, बेफिकिरी होती. चेहर्‍यावर राजेशाही तेज होतं. आमच्या सारख्या कोण कुठल्या चार माणसांशी बोलण्यात त्यांना काही स्वारस्य वाटत नव्हतं. प्रश्न सुद्धा अगदी शांत स्वरात आमच्या कडे न पाहता भलतीकडेच कुठेतरी बघत विचारलेले.
आनंद दादा तसे कुणाला न ऐकणारे. गोड बोलून बोलून आपल्याला पाहिजे ती गोष्ट पदरात पाडून घेणारे. पण राणोजींचे रोखठोक, स्पष्ट आणि कुणाची मुलाहिजा न बाळगता केलेलं बोलणं ऐकून तेही चक्रावले. काही क्षण फक्त ऐकतच राहिले. मीच मग राणोजींना नम्रपणे विचारलं,
"मग वाड्याचे बाहेरून फोटो काढले तर चालतील का?"
"व्हय काढा की", यावेळी राणोजींचा आवाज जरा खाली आल्यासारखा वाटला.
"मग या बांधाकामांपैकी जुनं बांधकाम कोणतं?"
"हे व्हय दिसतंय ते सगळं जुनंच हाय की", बसल्या जागी हातवारे करीत राणोजी म्हणाले.
राणोजींचा मूड बदलण्याआगोदर मी सर्व जुन्या बांधकामांचे फोटो काढून घेतले!









तो पर्यंत आनंद दादांचं बोलणं परत सुरू झालं.
"ते धनाजी जाधव कुठले? कोल्हापुरचेच का?" ज्यांची उत्तरे माहीत आहेत ते प्रश्न उगाचच पुन्हा पुन्हा विचारण्याची आनंद दादांची खोड आहे.
"ते अमरावतीचे"
"मग पेठ वडगावला काय आहे?", पुन्हा ज्याचं उत्तर माहित आहे असा प्रश्न. कदाचित खात्री करून घेण्यासाठी असेल.
"तिथं त्याला मारलं".
"त्यांचा इथं कुठं वाडा आहे का?"
"एहॅ त्यातलं एवढं काय म्हाईत न्हाई." असं म्हणत राणोजींनी एक मोठ्ठी जांभई दिली. आम्ही काय समजायचं ते समजलो!
आनंद दादा निघण्यासाठी ख्रुर्ची वरून उठले. राजघराण्याची प्रथा म्हणून राणोजींच्या पायाला हात लावण्यसाठी खाली वाकले.
राणोजींनी हात वर करत "र्‍हाऊ दे. त्याची काय गरज न्हाई" म्हटलं.
राणोजींचा मूड यावेळी जरा चांगला वाटला. म्हणून मी एक धाडस केलं.
"साहेब तुमची परवानगी असेल तर तुमचा एक फोटो घेऊ का?"
"या असल्या कपड्यात नको" राणोजी सदर्‍याची छाती धरत म्हणाले.
"तुमची भेट झाली तसं तुमचा एक फोटो मिळाला असता म्हणजे बरं झालं असतं." मी विनंती करत म्हणालो.
"अजिबात नको. या असल्या कपड्यात फोटो काढताय व्हय? काय तरी खुळ्यागत."
आपले फोटो राजेशाही थाटातलेच असावेत असा राणोजींचा आग्रह दिसला. मी शाहू महाराजांचे राजेशाही थाटातले एक छायाचित्र पाहिले होते. राणोजी अशा प्रकारच्या पोषाखात कसे दिसतील त्याचा विचार करू लागलो. कॅमेरा बंद करून व्यवस्थित ठेऊन दिला. माझी निराशा झालेली राणोजींच्या बहूदा लक्षात आली असावी. ते म्हणाले,
"एक काम करा, जाताना गावतलं जुनं हनुमान मंदिर, राममंदिर पाहून जा. तिथं माझा एक फोटो लावला आहे. तो पहा."
"बरं धन्यवाद", म्हणुन आम्ही निघालो.
बराच वेळ चौकशी करत गावातून फिरल्यानंतरही हनूमान मंदिर सापडेना. शेवटी मंदिर सापडलं पण चोहोबाजूने काटेरी तारा लावून बंद केलं होतं. बाहेरुन तरी मंदिर जुनाट दिसत होतं. राम मंदिरही कदाचित असंच बंद असेल म्हणून तो नाद सोडला.
परतीच्या वाटेवर चिखली म्हणून एक ऐतिहासिक गाव असल्याचं आनंद दादांनी सांगितलं. गावात काही तरी जुनी बांधकामं आहेत असं कळलं. गाडी चिखली गावात वळवली. गावाच्या एका बाजूला दोन मजली भव्य वाडा होता. वाड्याच्या चोहोबाजूला पुरूष-दीड पुरूष उंचीची तटबंदी होती. प्रवेश द्वाराची कमान तुटलेली होती. प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूला दोन कोठ्या होत्या. गावातली मंडळी त्यांचा उपयोग लघूशंकेसाठी करत होती!



वाडा गावाच्या एका बाजूला असल्याकारणाने वर्दळ कमी होती. एवढ्यात एक गॄहस्थ मोटरसायकलवरून गावाबाहेर पडताना दिसले. त्यांना थांबवून वाड्याबद्दल विचारलं. आम्हाला वाटलं एवढ्या क्षुल्लक कारणासाठी थांबवलं म्हणून हा माणूस बहूदा चिडणार. गाडी बंद करून तो आमच्याजवळ आला आमच्याबद्दल चौकशी करू लागला. मी मुंबईहून आलोय आणि दुसरा माणूस प्रोफेसर आहे म्हटल्यावर त्याला बहूदा आदर वाटला असावा. त्याने माहीती सांगितली, "आमच्या गावात पुर्वी नाणीबाई चिखली नावाची एक महिला होऊन गेली. गावाला चिखली हे नाव तिच्यामुळंच मिळालं. तिच्याकडे बराच जमीन जुमला होता. गावात असणारा वाडा तिचाच. गावात तिला बरंच वजन असावं. पण तिला मूळबाळ नव्हतं. मरताना आपली सर्व जमीन तिने कागलकर घाटगे घराण्याला देऊन टाकली. नंतर बरीच पडझड झाली. मुख्य प्रवेश द्वाराची कमान तर शासनानेच तोडली". इलेक्ट्रीक वायर गावात नेताना कमान आडवी आली. वायरची जागा बदलण्या ऐवजी कमानच तोडली! नाणीबाई थोडीच येणार आहे दाद मागायला? उरल्यासुरल्या दरवाजाची अब्रू गावकरी लघवी करुन घालवतात! ही वरवरची माहीती सोडली तर ती कोणत्या राजघराण्याशी संबधीत होती का? सैन्यात तिने काही पराक्रम केला होता का? हे आणि इतर प्रश्न अनुत्तरीतच राहिले.पण एवढ्या जमिन जुमल्याची आणि वाड्याची मालकीण होण्यासाठी तिने काहीतरी पराक्रम केलाच असावा असं वाटतंय. उशीर झाला होता म्हणून घाई घाईत वाड्याचे फोटो काढले.









रविवार असल्याकारणाने वाड्याची चावी संभाळणारा युवक गावाबाहेर होता. हा वाडासुद्धा आतून पाहता आला नाही. एका दरवाजाच्या चौकटीवर काही देव कोरले होते. त्यातला मोठ्या पोटाचा गणपती ओळखता आला. दुर्दैवाने गणरायाचे मुख तुटले होते. इतर देव काही ओळखता आले नाहीत. देवांचं कोरीव काम फारच आवडलं.



परतताना 'सेनापती' या शब्दाचा उलगडा झाला एवढंच समाधान लाभलं. कोल्हापुरच्या पुढच्या भेटीत नाणीबाईचा वाडा आतून पहायचा आहे, पेठ वडगावची धनाजी जाधवांची समाधी पहायची आहे.

दुसर्‍या दिवशी सकाळी सुरेख धुकं पडलं होतं. सकाळी दारात बसल्या बसल्याच घेतलेला हा फोटो.

Labels: