Tuesday, March 24, 2009

गमतीशीर देवपुजा

मी हल्ली आठवड्यातून एक दिवस तरी घरातल्या देवाची पुजा करतो. रोज करायला अजून तरी जमलेलं नाही. देवपुजा झाल्यावर देवाबरोबर आईच्याही पायाला हात लावतो. वाटेतल्या सगळ्याच नाही पण बर्‍याच देवळासमोरून जाता जाता नमस्कार करतो. कधी कधी लांबच्या देवदर्शनाला सुद्धा जातो. पण आजही देवासमोर उभं असताना तो गमतीदार किस्सा आठवतो...

लहान पणी मी नास्तिक, विज्ञाननिष्ठ वगैरे काही तरी होतो. मी कधी देवळात जात नसे, घरातल्या देवाची पुजा करीत नसे. वडील सुद्धा देवभोळे होते असं नव्हे. पण देव, धर्म याचं कधी स्तोम माजवलं नाही. आई मात्र देवपुजा, इतर प्रथा आवर्जून पाळत असे. गिरणीकामगाराच्या घराला साजेसं असं देवालय आमच्या घरात होतं. एक लाकडी फळी भिंतीवर डोक्याच्या उंचीला आडवी मारलेली. त्यावर लाकडी चौकटीतील देव. टिटवाळ्याचा गणपती, महालक्ष्मी, दत्तगुरू आणि एक गोंडस बालकॄष्ण. बालकॄष्णाचा फोटो म्हणजे चक्क कोणतं तरी भेटकार्ड किंवा लग्नाची पत्रिका की असंच काहीतरी होतं. आईला तो बालकॄष्ण फार आवडला म्हणून तिच्या सांगण्यावरून त्याला फ्रेम बनवून देवाच्या फळीवर बसवलेला. अशा सगळ्याच देवाची रोज पुजा होत असे. ज्याला माझ्या लेखी काही अर्थ नव्हता. याविषयावरून माझे इतरांशी बरेच वादंग होत. माझा विज्ञानवाद, वैज्ञानिक दॄष्टिकोन सगळ्यांच्या डोक्यावरून जात होता. आणि त्यांचं उठसुठ प्रत्येक गोष्टीत घुसवलेला धर्म आणि देव माझ्या डोक्यावरून जात होता. माझं प्रत्येक गोष्टीचं वैज्ञानिक पातळीवरून केलेलं विश्लेषण इतरांना नेहमी अतिशहाणपणाचं वाटे, 'हा एवढाच शहाणा आणि जगातले इतर मुर्ख?' असे इतरांना वाटे. आणि इतरांचं 'चमत्कार होऊ शकतात' या विधानाचं पुरावा म्हणून रामायणातल्या रामाने सोडलेला ब्रम्हास्त्राचा दाखला ऐकून माझं टाळकं फिरत असे आणि या वादाचं पर्यवसान नेहमी भांडणात होत असे. पण हे चार पार वर्षापुर्वीचं सांगतोय. म्हणजे मी आता काही खुप पोक्त आणि अस्तिक झालोय असं नाही. पण काम धंद्याच्या निमित्ताने म्हणा किंवा इतर काही कारणास्तव म्हणा माझा वेगवेगळ्या प्रांतातील, धर्मातील लोकांशी संबध आला. आपलं बोलणं दुसर्‍याला घसा फोडून पटवून सांगण्यापेक्षा त्याचं पुरेसं ऐकून त्याच्या मनस्थितीचा अंदाज घेऊन हळूहळू सुचवून सांगण्यात शहाणपणा आहे हे कधीतरी उमगलं. असे बरेच अनुभव ऐकून घेतल्यानंतर देव, धर्म, अस्तिकपणा, नस्तिकपणा या सगळ्यांच्या माझ्या मनात असलेल्या संकल्पना धडाधड ढासळत गेल्या आणि पुर्णपणे विज्ञाननिष्ठ कसोट्यांवर आधारलेली जिवनशैली जगातला कोणताही समाज स्विकारू शकत नाही या निष्कर्शाप्रत मी कधीतरी आलो.

हा गमतीदार किस्सा माझ्या त्या स्थित्यंतराच्या काळातील आहे.

घराची पुनर्बांधणी झाली आणि त्या लाकडी फळकूटावरचे देव लक्ष्मी, दत्तगुरू, तो आईचा आवडता बालकॄष्ण सगळेच देव खाली उतरवण्यात आले. त्याऐवजी एकच छानसा छोटासा देव्हारा आणि त्या देवार्‍याला साजेशी अशी गणपतीची छोटीशी मुर्ती आणली. आईला नाहीच आवडला तो देव्हारा आणि ती देवाची मुर्ती. पण शेवटी तो देवच ना, असं म्हणून आईने मोठ्या मनाने त्याला स्विकारलं. वीत-दीड वीत उंचीचा देव्हारा आणी दोन तीन इंच उंचीचा गणपती! पहिल्या दिवशी गणरायाला देव्हार्‍यात बसवून आईच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पुजा केली. सकाळी उठून बघतो तर गणराय उजवी कडे तोंड करून बसलेला. काय चमत्कार झाला काय असं म्हणून पुन्हा त्याला समोर तोंड करून बसवला. दुसर्‍या दिवशी पाहतो तर गणराय डावीकडे तोंड करून बसलेला! तिसर्‍या दिवशी तर गणराय पुर्णपणे पाठ दाखवत देव्हार्‍याच्या एका कोपर्‍यात रूसल्यासारखा बसलेला! नंतर लक्षात आलं शेवटी उंदीर म्हणजे गणरायाचं वाहन. तोच त्या लहान मुर्तीला जाता येता धक्के मारून वाहून नेत होता. बाकी त्या मुर्तीच्या आकाराचा गणपती सहज त्या खर्‍याखुर्‍या उंदरावर बसू शकला असता. शेवटी गणरायाच्या मुर्तिच्या तळाला गोंद लावून त्याला शांत एका जागेवर बसण्याची शिक्षा देण्यात आली!
पहिले काही दिवस व्यवस्थित पुजा झाली. पण परत गणरायाला वाईट दिवस आले. त्यावर धूळ बसू लागली. हार, फुलं सुकू लागली. एके दिवशी आई आमच्यावर चिडली. लगोलग साफसफाई करायला घेतली. देवारा भिंतीवरून उतरवला. देवारा आणि गणराय दोघानांही निरमा डिटर्जंटने चांगली घासून पुसून आंघोळ घातली, लख्ख केले, पंख्याखाली ठेवून वाळवले. देव्हारा पुन्हा भिंतीवर अडकवला. आई चिडलेली असल्याकारणाने ती लक्ष देत नव्हती. तुमचं तुम्ही काय करायचं ते करा म्हणून आई आपल्या कामात मग्न होती. इकडे मी ही मग गंभीरपणे आठवतील तेवढ्या पुजाविधी करत होतो. वर सांगितल्याप्रमाणे माझा स्थित्यंतराचा काळ असल्यामुळे माझं देवपुजेविषयीचं ज्ञान जेमतेमच होतं. आधी गंध लावायचा कि आधी हार घालायचा काही कळत नव्हतं. पणती ठेवायची की उदबत्ती लावायची? का दोन्ही लावायचं? बरं नक्की पणती म्हणायचं कि निरांजन म्हणायची हे अजूनही माहीत नाही. सगळा घोळ झाला होता. कशाचा कशाला पत्ता लागत नव्हता. मुळात काही सामान सापडत नव्हतं. आईला विचारण्याची सोय नव्हती. शेवटी गंध नाहीच सापडला. देव्हार्‍याला हार घातला. मुर्ती लहान असल्याने पुर्ण देव्हार्‍याला हार घालायची पद्धत आमच्या घरात रूढ झाली होती. फुलं देव्हार्‍यात ठेवली. पणती/निरांजन तेवढी आईने तयार करून दिली. ती देव्हार्‍याची ड्रॉव्हरसारखी फळी असते त्यावर ठेवली. सुगंधी अगरबत्ती पेटवून घंटीच्या किणकिणाटात देव्हार्‍यावरून एक-दोनदा फिरवली. हात जोडून नमस्कार केला. 'हे इश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे...' ही प्रार्थना मनातल्या मनात म्हटली. आणि झालं एकदाचं म्हणून टि. व्ही समोर बसलो.

मग माझे बंधूराज देवासमोर नतमस्तक झाले. मान वर करून विचित्र नजरेने देव्हार्‍या कडे पाहू लागले. एकदा माझ्याकडे त्याच विचित्र नजरेनं पाहीलं. मग पुन्हा देव्हार्‍यातील फुलं विस्कटली. खात्री झाल्यावर माझ्याकडे वळून मोठ्याने म्हणाले,
"देव कुठे आहे रे ए?"
मी ही मग फुलं विस्कटली. गणपती कुठं सापडतो का पाहीलं. गंध, घंटी सापडत नाही तो पर्यंत ठीक होतं. पण देवपुजा झाल्यावर देवच हरवणे हे काही झेपत नव्हतं. बंधूराज हसत होते आणि मी डोकं खाजवत कुठे बरं गणपती गेला असेल हा विचार करत होतो.
शेवटी गणपती पंख्यासमोर ठेवलेला सापडला. मघाशी गणपतीला आंघोळ घातल्यानंतर सुकण्यासाठी पंख्यासमोर ठेवला होता. हद्द म्हणजे मी तो तिथेच विसरलो आणि चक्क रिकाम्या देव्हार्‍याची पुजा केली होती !!!!!!!
आईने डोक्यावर हात मारला. बंधूराज खो खो हसू लागले. भलताच खजील झालो मी. पण मलाही मग हसू आवरलं नाही. पुन्हा गणरायाला देव्हार्‍यात बसवून पुजा केली.

मग काही दिवसांनी एक नवीन मोठ्ठा देव्हारा घेतला. त्यावर पुर्वीसारखे चौकटीतले देव बसवले, एक सोडून चांगले तीन देव आणले आणि ते देव्हार्‍या बाहेर निघणार नाही याची आवर्जून व्यवस्था केली. कितीही फुलांचा ढीग ठेवला तरी देव दिसतील याची व्यवस्था केली. देवाला गंध लावल्याशिवाय पुढे जायचं नाही असा अलिखित नियम केला.
आता मात्र माझ्याकडून अशा चुका होत नाहीत. प्रत्येक पुजा बरोबर होणार याची शंभर टक्के ग्यारंटीची खात्रीच.