Friday, January 23, 2009

क्रिकेटचा सामना आणि देवपूजा

गिरणगावातल्या माझ्या घराचा परिसर अगदीच विचित्र. चार पाच घरांची मांडणी एकमेकांकडे तोंडं करून, सर्व घरांना एक सामाईक अंगण, आणि इथं पोहोचण्यासाठी एक चिंचोळी गल्ली. सर्व घरांची दारं सताड उघडीच असत. सगळ्या घरातील चिली-पिली या सामाईक अंगणात खेळत. ज्यांना मोठ्या मैदानात इतर मोठी मुलं खेळायला घेत नाहीत अशा साधारण दोन ते सहा वयोगटातील लहान मुलांचं हे हक्काचं खेळण्याचं ठिकाण होतं. त्यांच्या आयासुद्धा मुलं नजरे पासून फार दूर नको म्हणून तिथेच खेळायची परवानगी देत. दुपारच्या वेळी यांच्या खेळांचा पार दंगा उडायचा. दुपारच्या वेळी तळलेली सुरमई आणि बांगड्याचा रसा खाऊन वामकु़क्षी घेणारे लोक या मुलांना फार डाफरायचे. पण त्यांच्या स्वत:चा कार्टा सुद्धा त्यांच्यात सामील असल्यामुळे फार काही करता यायचं नाही. मी मात्र जाता येता त्यांचे नवनवीन खेळ बघत असे.

या चिमुरड्यांचे खेळ तरी काय असणार? कुणीतरी त्यातल्या त्यात मोठा असणारा मास्तर व्हायचा आणि इतरांना शिकवायचा. या कंपूतली सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणजे ७ बर्षाची सिद्धी. मास्तरीणबाईंची भूमिका बहूदा ती बजावायची. त्यातल्या काही अतिचिमुरड्यांना तर शाळा, गुरूजी, अभ्यास म्हणजे काय हेच माहीत नसायचं. मग काय तो आपल्या जाग्यावर शांत बसला तरी त्याने विद्यार्थ्याची जबाबदारी पार पाडली म्हणायचं! शिकवणीपेक्षा मास्तरांचं मारणं आणि म्हणून पोरांचं तारस्वरातलं केकाटणंच अधिक व्हायचं. कधी कधी क्रिकेट सुरू व्हायचं. 'क्रिकेट' बोलायला कठीण असल्या कारणानं त्याचे बॅट-बॉल असं उच्चारायला सोपं असं नामकरण व्हायचं. या चमूचं क्रिकेट संबधातलं ज्ञान अगाध होतं. फक्त त्यातल्या काही संज्ञा उच्चारायला भारीच कठीण असल्यामुळे त्याला प्रतिशब्द शोधावे लागायचे. म्हणजे "वाईड बॉल"ला "वाईट बॉल", "एल.बी.डब्ल्यू" ला "एबली डबलू" असं काहीतरी म्हणावं लागायचं. या संज्ञांचे अर्थही अगदी थोर होते. गोलंदाजाने चेंडू बरोबर टाकला नाही तर तो "वाईट बॉल" म्हाणून संबोधला जायचा. बॉल पायाला लागला की तो पाय ज्या माणसाचा आहे तो माणूस त्याच्या पायासकट एबली डबलू झाला असं म्हणायचं, भले तो माणूस एखादा फिल्डर्सपैकी का असेना. पण तो एबली डबलू झाला हे निश्चित. फिल्डरचे एबली डबलू झाल्यावर त्याला खेळातून बाद करायचे का नाही हे निश्चित ठाऊक नसल्याने तो चेंडू पकडणारा, त्याचा पाय आणि तो एबली डबलू सगळ्यांकडेच दुर्लक्ष करणे योग्य असा निष्कर्ष काढला जाई.

पहिलीतल्या आयुषच्या बहीणीची प्लॅस्टिकची बॅट आणि प्लॅस्टिकचा बॉल मिळाला की सामने रंगायचे. आयुष त्याला आणि त्याच्या नुकत्याच चालायला शिकलेल्या बहिणीला, अस्मिताला, खेळायला घ्यायच्या अटीवर आपली चेपलेली अमुल्य बॅट द्यायला तयार व्हायचा. एवढ्या लहान मुलीला बॅट-बॉल खेळता यायचं नाही असं इतर मुलं त्याला समजावुन सांगायची. पण आयुषचा हट्ट कायम असायचा. मग अस्मिताला खेळायला घेताना निर्माण होणाया अडचणींवर बराच खल व्हायचा. अस्मिता नुकतीच चालायला लागली असल्यामुळे बॉल टोलवल्यावर तीला 'रन' काढण्यासाठी पळता येणं शक्य नाही, यावर अस्मिताला फक्त बॅटिंग करायला सांगू, रन काढण्यासाठी मी पळतो असं आयुष सुचवत असे. पण मग अस्मिता आणि बॅट साधारण एकाच उंचीची असल्यारणाने तिला बॆंटींग करता येणं कठीण आहे अशी नवीनच समस्या निर्माण होई. यावर आपण तिला फिल्डींग करायला लावू असा उपाय ठरत असे. यावर कुणीतरी अस्मिताला पळता यायचं नाही या मूळ मुद्याची आठवण करून देई. यावर खात्रीचा उपाय म्हणून अस्मिताच्या खेळाची चाचणी करायचा प्रस्ताव कुणीतरी ठेवत असे. अस्मिता मात्र आपल्या इवल्याश्या हाताने बॅटला मिठीत घेऊन दुसया हाताने चॉकलेट खाण्यात मग्न असे. एवढ्या मोठ्या वादंगाचा विषय आपण आहोत याची सुतराम कल्पना तिला नसायची. चाचणी म्हणून आयुष अस्मिताकडे बॉल टाकत असे. सर्वजण "अस्मिता बॊल पकड", "लवकर पकड", "तो बघ तुझ्या पायाजवळ", "अग असं काय करतेस?" असा एकच गलका करीत. याचा परिणाम एवढाच व्हायचा की अस्मिता चॉकलेट खायचं सोडून आलटून पालटून सगळ्यांच्या तोंडाकडे पहायची. गलका थांबला कि परत चॉकलेट खाणं सुरू व्हायचं. असं दोनतिनदा झाल्यावर कोणीतरी आपल्याकडे बॉल नावाची वस्तू टाकणार आहे आणि आपण ती पकडायची आहे एवढं अस्मिताला समजत असे. अशावेळी चॉकलेट खाणं थांबवण्याऐवजी ते लवकरात लवकर खाऊन संपवणे जास्त सयुक्तिक आहे हे तिला बरोबर समजायचं. चॉकलेट खाऊन चिकट झालेली बोटं आयुषच्या शर्टाला पुसून ती बॉल पकडण्यासाठी दोन्ही हात कमरेवर ठेऊन उभी राहायची! चेंडू टाकण्याची जबाबदारी तीन वर्षाच्या कुणालवर असायची. याचा बराचसा वेळ इलॅस्टिक सैल झालेली चड्डी सावरण्यातच जायचा. चेंडू फेकण्यासाठी पाच-सात पावलं पळायचं असत असं तो कुठेतरी शिकला होता. पण त्यात एक मोठी अडचण होती. पळताना पावलागणिक त्याची चड्डी थोडीथोडी खाली येत असे आणि कधी कधी पाय अडखळून पडत असे. पण त्याची किंवा इतरांची याबाबत काही तक्रार नसे. पण तो अस्मिताकडे चेंडू एवढ्या जोराने फेकत असे की चेंडू फेकून झाला हे तिच्या ध्यानातच येत नसे. ती चेंडूची वाट बघत कुणालच्या तोंडाकडे पाहत राही. अस्मिताचे विरोधक मग घाईघाईने "अस्मिता बॅट-बॉल खेळू शकत नाही" असे जाहीर करून टाकत. आयुष मात्र हार मानायला तयार नसे. मघापासून अस्मिता लहान आहे हे मानायला तयार नसणार आयुष कुणालला दम देत असे,

"अरे ये कुण्या, बॉल हळू टाक. ती लहान आहे दिसत नाही काय? सरपटी बॊल टाक."

मग कुणाल पुढचा बॉल कमरेवर हात ठेवून उभ्या असणाया अस्मिताच्या दिशेने, तोसुद्धा अगदी हळू, सरपटत जाईल अशा बेताने टाकत असे. कमरेवरचा हात उचलून खाली वाकून चेंडू पकडण्याची क्रिया होईपर्यंत चेंडू अस्मिताच्या दोन पायांमधून पलिकडे गेलेला असे आणि अस्मिता कमरेतून वाकून स्वत:च्याच ढेंगेतून चेंडू आणी इतर उलट्या गोष्टी कशा दिसतात पाहण्यात मग्न होऊन जाई! आपल्याच ढेंगेतून खाली डोकं वर पाय असा दिसणारा आपला भाऊ आयुष, त्याच्यामागं रोजच्यापेक्षा वेगळाच दिसणारा आपल्या घराचा दरवाजा आणि रोज दाराखाली दिसणारी चप्पलं दारावरच्या छपरावर चिकटलेली, हे असं सारं अजब पाहून आपण चेंडू पकडायला खाली वाकलेलो आहोत याचा अस्मिता बाईंना विसर पडायचा!

अशा बर्‍याच परिक्षणांनंतर अस्मिता खेळू शकणार नाही हे आयुषच काय स्वत: चेंडू सुद्धा मान्य करत असे. परंतू बॅट अस्मिताची असल्याकारणाने मान म्हणून अंपायरचं स्थान अस्मितालाचा द्यायचं एक मुखाने मान्य होत असे! चेंडू टाकणारा टाकेल, बॅटींग करणारा करेल, फिल्डिंग करणारा करेल. अंपायरचा त्रास होण्याचं काहीच कारण नाही. फक्त फोर गेला की सिक्स गेला, कोण आऊट झाला, नो बॉल कि वाईट बॊल, कोण एबली डबलू हे एवढं समजलं म्हणजे झालं. बॅट अस्मिताची असल्यामूळे ती एवढीतरी हुशार नक्कीच असेल असं मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता. "अस्मिताचे खेळातील स्थान" ह्या महत्वाच्या चर्चेचा असा निकाल लागला. शिवाय अंपायर कोण होणार हा सुद्धा प्रश्न त्याबरोबरच सुटला. या नंतरचे काम काही कठीण नसायचं.

टीम बनवायचं काम सगळ्यात मोठ्या व्यक्ती कडे म्हणजे कुणालची बहीण सिद्धीकडे असायचं. आपल्या टीम साठी सभासद निवडताना बरंच राजकारण व्हायचं. सगळ्याबाजूने विचार व्हायचा. बरेच मुद्दे विचारात घेतले जायचे. काही वेळापुर्वी कुणाचं कुणाशी भांडण झालं होतं, कुणी कुणाला खाऊ दिला नाही किंवा नाखूषीने दिला, कुणाची उंची किती आहे, दोन्ही बाजूच्या सभासदांची सरासरी उंची काय, पहिल्यांदा बॆंटिंग मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता कोणत्या टीमला आहे, आपला सगळ्यात आवडता मित्र कोणत्या टींममध्ये आहे, कुणाची आई घरात चेंडू गेल्यावर जास्तीत जास्त आरडाओरड करते, आधीच्या खेळात कुणी कुणाला हरवलं, कुणाच्या हातात कुठला खाऊ आहे, विनंती केल्यावर त्यातला थोडासा खाऊ आपल्याला मिळण्याची काय शक्यता आहे अशा अनेक शक्यता विचारात घेऊन टीम बनवल्या जायच्या.

कुणालला गोलंदाजीची भलतीच आवड होती. त्यामुळे सामना सुरू झाल्यानंतर जो पक्ष फलंदाजी घेईल त्याच्या विरुद्धबाजुच्या पक्षात तो खुशाल जात असे. त्याची भरपाई म्हणून त्या बाजूचा एक अत्युच्च फलंदाज पहिल्या पक्षाला जाऊन मिळत असे.

फलंदाजाने टोलवलेला चेंडू कोणत्या तरी घराच्या भिंतीला आपटला की फोर-फोर-फोर आणि चेंडू दोन फूट जरी उंच उडाला की सिक्स-सिक्स-सिक्स असे ओरडत सगळेच जण दोन्ही हात उंचावून नाचू लागत. अगदी चेंडू पकडणारे फिल्डर्स सुद्धा! अचानक असा गोंधळ झाल्यावर कुणाची तरी आई पडल्या पडल्याच "काय वरडायला लागला रे पोरांनो, गप खेळता की बॉल घेऊ तुमचा?" असा दम देई. तेवढ्या पुरते सर्वजण शांत होत. क्रिकेटमध्ये अधून मधून धावा काढाव्या लागतात म्हणून फलंदाज चेंडू टोलवून पळत असे. चेंडू पकडण्यासाठी सगळेच फिल्डर्स चेंडू मागे धावत आणि चेंडू कोण पहिला पकडतो अशी नवीनच स्पर्धा सुरू होई! अशी सगळी पळापळ पाहून खुद्द अंपायर सुद्धा उत्तेजित होऊन अलगद पावलं टाकत पळत असे! पण नक्की कुठे पळायचं हे ठाऊक नसल्यामुळे अंपायरचं पळणं दिशाहीन असे.

खेळताना कुणालातरी बॅट लागायची किंवा चेंडू नेमका डोक्यावर लागायचा त्यामुळे रडारड व्हायची. रडणार्‍याची आई रडण्यावर उपाय म्हणून अजून दोन धपाटे देऊन त्याला ओढत घरात घेऊन जायची. चॉकलेट खाऊन बराच वेळ झाल्यामूळे अंपायरला भूक लागत असे. कुणाला तरी शू-शू लागायची म्हणून तो निघत असे. असे करत करत सामन्यातून एकेक मेंबर गळायचा आणि मॅचचा काही निकाल न लागता संपायची. सर्व शांत झाल्यावर मी सुद्धा कंटाळून एक डुलकी काढण्याचा प्रयत्न करी.
अशा शांत दुपारच्या वेळीमाझा डोळा लगतो न लागतो तोच अचानक पुन्हा गलका होत असे, घंटीची किणकिण आणि ’सुखकर्ता दु:खहर्ता" च्या चालीवर बोबडे बोल ऐकायला येत असत...

सुककलता बुकलता वाल्ता विगनाची...
नुलवी पुलवी प्लेम...

असा उच्चारांचा उद्धार आणि अर्थाचा अनर्थ करीत आरती चाललेली ऐकून मी डोळे चोळत बघायला येत असे...
पाहतो तर बालगोपाळांचा देवपूजा-देवपूजा खेळ चाललेला असे. कुठल्याश्या वितभर लांबीच्या फाटक्या फोटोला भिंतीला नुसताच टेकवून ठेवलेला असे. कुणाच्यातरी देवघरातल्या देवाला घातलेला हार या फोटोला पडलेला असे. मारी बिस्किट साखरेबरोबर कुटून ती पावडर देवासमोर प्रसाद म्हणून ठेवलेली असे, बाजूला तिर्थ म्हणून पाण्याच्या ग्लासात अर्धवट विरघळलेली लेमलेट्ची गोळी असे. मघाच्या गोलंदाजाचा उघडाबंब भटजी झालेला असे. आणि अंपायरची नजर देवापूढे ठेवलेल्या प्रसादावर असे. इतर खेळाडू भक्तीभावे इतरांच्या तोंडाकडे बघत मोडक्या तोडक्या भाषेत आरती म्हणत उभी असत.

कुतुहल म्हणून मी कुठला देव एवढा प्रसन्न झाला आहे हे पाहत असे आणि काही वर्षापुर्वी टि.व्हि.वर सुरू असलेल्या महाभारत या मालिकेतील दुर्योधनाची पूजा गणरायाची आरती गाऊन होत असलेली पाहून धन्य होत असे...